Shirur Crime News: वाहनाला कट मारल्याचा जाब विचारल्याने 2 जणांना मारहाण; चारचाकी गाडीची फोडली काच
Shirur Crime News: अल्पवयीन चालकासह तीन अज्ञात व्यक्तींविरुद्ध शिरुर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

न्हावरे : शिरूर तालुक्यातील न्हावरे येथे पांढऱ्या स्कॉर्पिओ गाडीने कट मारल्याच्या कारणावरुन झालेल्या वादाचे रुपांतर मारहाणीत झाले. यावेळी पिस्तूल असल्याची धमकी देत सहा जणांनी दोघांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, तसेच दगड आणि लाथांनी स्विफ्ट कारचे नुकसान केल्याची तक्रार शिरुर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत नारायण वाघमारे (वय २७, रा. गुनाट, ता. शिरुर, जि.पुणे) हे गुरुवारी (दि १५) सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास ते त्यांचा चुलत भाऊ अभिजीत प्रकाश वाघमारे याच्यासह स्विफ्ट कारने गुनाट वरुन न्हावरे येथे ठिबक सिंचनाचे पाइप आणण्यासाठी जात होते.
गुनाट-न्हावरे रस्त्यावर आप्पा खेडेकर यांच्या घराजवळ समोरुन आलेल्या पांढऱ्या स्कॉर्पिओने त्यांच्या कारला कट मारल्याने जाब विचारण्यासाठी कार थांबवली असता, स्कॉर्पिओमधील अल्पवयीन चालक यांनी दोघांना शिवीगाळ व दमदाटी केली.
यानंतर त्या अल्पवयीन चालकाने आपल्याकडे पिस्तूल असल्याचे सांगत स्विफ्ट कार मधील दोघांना गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर रवी पंढरीनाथ बिडगर तसेच आत्माराम पंढरीनाथ बिडगर आणि अन्य तीन अज्ञात व्यक्ती घटनास्थळी आल्या. सर्वांनी मिळून दोघांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि स्विफ्ट कारचे दगड व लाथा मारुन नुकसान केले.
या प्रकरणी प्रशांत वाघमारे यांनी एका अल्पवयीन चालकासह रवी पंढरीनाथ बिडगर, आत्माराम पंढरीनाथ बिडगर आणि त्यांच्यासोबतच्या तीन अज्ञात व्यक्तींविरुद्ध शिरुर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. या प्रकरणाचा पुढील अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र बनकर करीत आहेत.
वाहनाला कट मारल्याच्या किरकोळ कारणावरून थेट मारहाण, जीवे मारण्याची धमकी आणि वाहनाची तोडफोड झाल्याच्या या घटनेमुळे रस्त्यावरील वादातून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.





