पुणे जिल्हा | सहा महिन्यानंतर गायब कागदपत्रे पुन्हा केस फाइलमध्ये

दावडी (वार्ताहर)- सह धर्मादाय आयुक्त पुणे कार्यालयातून सहा महिन्यांपूर्वी गहाळ झालेली कागदपत्रे पुन्हा केस फाइलमध्ये समाविष्ट झाल्याची माहिती याचिकाकर्ते अशोकराव टाव्हरे यांनी दिली. त्यांनी तसे निवेदन उपमुख्यमंत्री तथा विधी व न्याय मंत्री, अतिरिक्त मुख्य सचिव, विधी व न्याय विभाग, धर्मादाय आयुक्त, सह धर्मादाय आयुक्त पुणे यांना दिले आहे.
कनेरसर (ता. खेड) येथील श्री यमाई देवस्थान प्रशासक कमिटी कामकाजात सन 2020 व 2021 मध्ये काही बरखास्त विश्वस्तांचा सहभाग होता. सह धर्मादाय आयुक्त पुणे यांनी 20/01/2020 रोजी सर्व विश्वस्त बरखास्त करून स्वतंत्र काम करण्याच्या प्रशासक कमिटीला सूचना केल्या होत्या; परंतु त्या निर्णयाची अवमानना होत होती.
तक्रारी करूनही दखल घेतली नाही म्हणून चॅरिटी अॅक्ट 41 एफ अन्वये नोव्हेंबर 2021 मध्ये सह धर्मादाय आयुक्त पुणे यांचेकडे अशोकराव टाव्हरे यांनी दावा (07/2021) दाखल केला. हा दावा अंतिम युक्तीवादासाठी प्रलंबित होता; परंतु अचानक ऑक्टोबर 2023मध्ये दाव्यातील अनेक महत्वपूर्ण कागदपत्रे गहाळ झाली असल्याचे टाव्हरे यांना अॅड. चिन्मय वाडेकर, अॅड. स्नेहल पिसाळ यांनी सांगितले.
त्यानंतर विधी व न्याय खात्याचे सचिव, राज्याचे धर्मादाय आयुक्त, सह धर्मादाय आयुक्त पुणे यांच्याकडे चौकशीची मागणी केली. दि. 16 जानेवारी 2024 रोजी चौकशी करून अहवाल पाठविण्याचे आदेश धर्मादाय आयुक्त यांनी दिले होते. कागदपत्रे सापडत नसल्याबाबत सह धर्मादाय आयुक्त कार्यालयातील कर्मचारी सांगत होते.
दि. 25 एप्रिल रोजी सुनावणी असल्याने अशोकराव टाव्हरे स्वतः वकीलांसह सह धर्मादाय आयुक्त कार्यालयात उपस्थित होते. तेव्हा अॅड. चिन्मय वाडेकर, अॅड. राजश्री खैरे यांनी गायब असलेली सर्व कागदपत्रे फाइलमध्ये असल्याचे सांगितले. त्यानंतर टाव्हरे यांनी सह धर्मादाय आयुक्त पुणे, न्या. सुधीरकुमार बुक्के यांची भेट घेतली, त्यांनीही कागदपत्रे सापडली असे सांगितले.
गेली सहा महिने केसमधून गहाळ झालेली महत्वपूर्ण कागदपत्रे सापडली, त्यात प्रतिज्ञापत्रे, पुरावे यांचा समावेश होता. केस फाइलमधील कागदपत्रांच्या प्रमाणित प्रती घेऊन लवकरच हा दावा मुंबई येथील सह धर्मादाय आयुक्त यांचेकडे वर्ग करण्यासाठी धर्मादाय आयुक्त यांचेकडे अर्ज करणार असल्याचे टाव्हरे यांनी सांगितले.





