कमल नाथ म्हणतात, शक्तिपरीक्षेला सामोरे जाण्यास तयार
भोपाळ: मध्यप्रदेशातील राजकीय सस्पेन्स कायम असतानाच शुक्रवारी त्या राज्यातील सहा मंत्र्यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आले. मुख्यमंत्री कमल नाथ यांच्या शिफारसीवरून राज्यपाल लालजी टंडन यांनी ते पाऊल उचलले. मंत्रिपदावरून हटवण्यात आलेले सर्वजण नुकतेच भाजपवासी झालेले नेते ज्योतिरादित्य शिंदे यांचे समर्थक आहेत.
ज्योतिरादित्य यांनी नुकताच कॉंग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांचे समर्थक असणाऱ्या मध्यप्रदेशातील सत्तारूढ कॉंग्रेसच्या 22 आमदारांनी राजीनामे दिले. त्यामध्ये मंत्रिपदावरून हटवण्यात आलेल्यांचाही समावेश आहे. ज्योतिरादित्य आणि त्यांच्या समर्थक आमदारांच्या बंडामुळे मध्यप्रदेशातील कॉंग्रेस सरकारच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. आमदारांचे बंड मोडून काढण्यासाठी नाथ सरसावले आहेत. त्यातून त्यांनी ज्योतिरादित्य यांचे समर्थक असणाऱ्या मंत्र्यांना हटवण्याची शिफारस केली होती.
दरम्यान, नाथ यांनी राज्यपाल टंडन यांची भेट घेऊन त्यांना एक पत्र सादर केले. त्यात त्यांनी विधानसभेतील शक्तिपरीक्षेला सामोरे जाण्याची सरकारची तयारी असल्याचे म्हटले. भाजप घोडेबाजारात गुंतला आहे. त्या पक्षाने कॉंग्रेसच्या 22 आमदारांना ओलीस ठेवले आहे, असा आरोपही पत्रात करण्यात आला आहे. मात्र, भाजपकडून सातत्याने कॉंग्रेस सरकार पाडण्याचा प्रयत्न करत असल्याच्या आरोपांचा इन्कार केला जात आहे.