नवी दिल्ली – तामीळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांना लक्ष्य केल्याबद्दल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी टीकास्त्र सोडले. सीतारामन यांनी इतरांवर टीका करण्याऐवजी बेरोजगारी आणि इतर समस्यांची चिंता करावी, असे त्यांनी म्हटले.
विरोधी पक्षांची आघाडी इंडियाची नुकतीच दिल्लीत बैठक झाली. त्या बैठकीला स्टॅलिन उपस्थित राहिले. त्यावरून सीतारामन यांनी स्टॅलिन यांच्यावर निशाणा साधला. तामीळनाडूला पाऊस आणि पुराने तडाखा दिला असतानाही मुख्यमंत्री बैठकीत सहभागी झाल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. त्या टीकेला सिब्बल यांनी सोशल मीडियावरून प्रत्युत्तर दिले.
सीतारामन यांनी स्टॅलिन यांच्यावर टीका करण्याऐवजी बेरोजगारी, देशावरील वाढते कर्ज, कुपोषित बालके, उपासमार, गरिबी आदी समस्यांची चिंता करावी. वेळ असल्यास सीतारामन यांनी महिला कुस्तीपटूंचीही चिंता करावी, अशी उपरोधिक टिप्पणी सिब्बल यांनी केली.
सिब्बल यांनी मागील वर्षी कॉंग्रेसला रामराम ठोकला. त्यानंतर ते समाजवादी पक्षाच्या पाठिंब्यावर अपक्ष सदस्य म्हणून राज्यसभेवर निवडून गेले. मागील काही काळापासून त्यांची इंडियाशी जवळीक वाढल्याचे दिसते.