पिंपरी – भाजपचे माजी महापौर व विद्यमान नगरसेवक केशव घोळवे यांना खंडणी घेतल्याप्रकरणी आज अटक झाली असली तरी पिंपरी मेट्रो स्टेशन येथील विस्थापित जागेवरील व्यापाऱ्यांनी पिंपरी पोलीस ठाण्यामध्ये नगरसेवक डब्बू आसवाणी यांच्या विरोधात अर्ज दिले आहेत. घोळवे यांच्या विरोधात चार जणांची तक्रार आहे तर डब्बू आसवाणी यांच्यावर तब्बल 92 व्यापाऱ्यांनी आरोप करत तक्रार केली आहे. त्यामुळे नगरसेवक आसवाणी यांना पोलिसांनी अटक करावी, अन्यथा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती, महापालिकेतील सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेला महापौर माई ढोरे, नगरसेविका योगिता नागरगोजे, अनुराधा गोऱखे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना ढाके म्हणाले, माजी उपमहापौर केशव घोळवे हे भाजपच्या माध्यमातून असंघटित कामगारांसाठी अत्यंत चांगले काम करत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर सूडबुद्धीने ही कारवाई करण्यात आली आहे. मेट्रोचे स्टेशन होत असताना तेथील शंभऱ व्यापाऱ्यांवर उपासमारीची वेळ येणार होती. घोळवे या व्यापाऱ्यांना गाळे मिळवुन देण्यासाठी वारंवार मेट्रो प्रशासनाकडे पाठपुरावा करत होते. या प्रकल्पाचे उद्घाटनही भाजप नेत्यांच्या हस्ते होणार होते. त्याचे श्रेय भाजपला मिळू नये, यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने हा कट रचला आहे. मात्र घोळवे यांच्या विरोधात आलेल्या केवळ तक्रार अर्जावर त्यांना अटक केली. तर तेथील 92 व्यापाऱ्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक डब्बू आसवाणी यांच्या विरोधात तक्रार अर्ज दिला आहे. या अर्जामध्ये आसवाणी यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले असून याच मार्केटमध्ये व्यवसाय करणारे अशपाक सिद्धीकी व मोहमद हे नगरसेवक डब्बू आसवाणी यांचे नाव सांगून आमच्याकडून पैसे घेत असल्याची तक्रार 92 व्यापाऱ्यांनी दिलेली आहे. या तक्रारीवरून आसवाणी यांना अटक करणे आवश्यक आहे. मात्र पोलीस कारवाई करत नाहीत. त्यामुळे उद्यापर्यंत आसवाणी यांच्या विरोधात कारवाई न केल्यास शुक्रवारी सत्ताधारी भाजपच्या वतीने पिंपरी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.