Santosh Deshmukh Case : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासासाठी सरकारकडून SIT स्थापन

मुंबई : बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सरकारकडून SIT स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये IPS बसवराज तेलींसह 10 पोलीस अधिकारी असणार आहेत. आयपीएस बसवराज तेली हे या समितीचे नेतृत्व करणार आहेत. बसवराज तेली सीआयडीमधील आर्थिक गुन्हे शाखेचे प्रमुख आहेत. एसआयटीमध्ये सर्वच अधिकारी बीड जिल्ह्यातले आहेत.
SIT मधील अधिकाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे
आयपीएस अधिकारी डॉ. बसवराज तेली – पोलीस उपमहानिरीक्षक ( टीमचे नेतृत्व)
1) अनिल गुजर, पोलीस उप अधीक्षक
2) विजयसिंग शिवलाल जोनवाल, स. पो. निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, बीड
3) महेश विघ्ने, पो. उ. निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, बीड
4) आनंद शंकर शिंदे, पो. उ. निरीक्षक, केज
5) तुळशीराम जगताप, सहा. पो. उ.निरीक्षक
6) मनोज राजेंद्र वाघ, पोलीस हवालदार
7) चंद्रकांत एस. काळकुटे, पोलीस नाईक
8) बाळासाहेब देविदास अहंकारे, पोलीस नाईक
9) संतोष भगवानराव गित्ते, पोलीस शिपाई
कोण आहेत आयपीएस अधिकारी डॉ. बसवराज तेली?
2010 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले डॉ. तेली हे एमबीबीएस डॉक्टर असून ते मूळचे बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील खंदीबुद या गावाचे सुपुत्र आहेत. पोलीस दलातील त्यांच्या सेवेस महाराष्ट्रातील पाचोरा (जि.जळगाव) येथून झाली. त्यानंतर त्यांनी औरंगाबाद येथे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून, पुणे येथे शह उपायुक्त म्हणून काम केले. तर, सांगलीचे पोलीस अधीक्षकपदही सांभाळले होते, सध्या ते पोलीस उपमहानिरीक्षकपदावर कार्यरत आहेत.
काय आहे नेमके प्रकरण?
केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं 9 डिसेंबरला अपहरण करण्यात आले होते. ते ज्या गाडीनं प्रवास करत होते, त्या गाडीला थांबवून सहा ते सात जणांनी त्यांचे अपहरण केले. यानंतर त्यांना जबर मारहाण करून त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले आहेत.





