Rohit Pawar । राज्यात सर्वच राजकीय पक्षाकडून विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीकडून राज्यभरात नेत्यांकडून सभा घेतल्या जात आहे. अशात आता काहीच महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणूका निवडणुकीवरून शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत नाव न घेता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता. अतृप्त आत्मा असा उल्लेख करत मोदींनी पवारांवर निशाणा साधला. यावरून आता रोहित पवार यांनी पुन्हा एकदा मोदींवर निशाणा साधला आहे. रोहित पवार म्हणाले,’आत्म्याचा मोदी साहेबांनी इतका धसका घेतला की इलेक्शन दोन महिन्यांवर असून देखील एक सुध्दा व्हिजिट त्यांची महाराष्ट्रात झाली नाही. नाहीतर कस असतंय दुसऱ्या राज्यांमध्ये इलेक्शन सुरू होतं, त्याआधी ते महिन्यापूर्वीच यायला सुरुवात करतात आणि नारळ फोडून खोटं आश्वासन द्यायला सुरू करतात.’ अशी टीका त्यांनी केली. ते पुढे म्हणाले,’विधानसभेचे इलेक्शन आता व्हायला पाहिजे होते, काय विरोधाभास आहे ते बघा मोदीसाहेब दिल्लीला लाल किल्ल्यावर काय बोलले अख्ख्या देशात एकदाच इलेक्शन झाले पाहिजे लोकसभेबरोबर’ ‘ ठीक आहे, मान्य करतो. मग जेव्हा महाराष्ट्राच्या इलेक्शनची गोष्ट येते, तेव्हा तुम्ही जम्मू काश्मीरचं इलेक्शन घेता,हरियानाचं इलेक्शन घेता आणि महाराष्ट्राचं इलेक्शन का बाजूला ठेवता? घाबरलात का?’ असा खडा सवाल त्यांनी विचारला. ‘ म्हणून तर सांगतो हे सरकार घाबरलेलं आहे, कुणाला घाबरलंय आम्हाला नाही, हे सरकार मतदारांला तुम्हाला घाबरलंय’ असं म्हणत त्यांनी टीका केली आहे.