Pune crime : सिंहगड रोडवर पोलिसांची धडक कारवाई; तीन पिस्तूल, चार जिवंत काडतुसे जप्त, दोघांना अटक
Pune crime : पुण्यातील सिंहगड रोड परिसरात पोलिसांनी दोन कारवायांत तीन गावठी पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे जप्त केली. दोन तरुण अटकेत, विधीसंघर्षित बालक ताब्यात.

Pune crime : सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे प्रतिबंधात्मक पेट्रोलिंगदरम्यान पोलिसांनी सलग दोन कारवाया करत तीन गावठी पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे जप्त केली. या कारवाईत दोन तरुणांना अटक करण्यात आली असून, एका विधीसंघर्षित बालकास ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाया १७ आणि १९ ऑगस्ट रोजी करण्यात आल्या.
दि. १७ ऑगस्ट रोजी तपास पथकाचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर यांच्या पथकाला वडगाव पठार येथील रेणुकामाता मंदिरासमोरील मोकळ्या जागेत रेकॉर्डवरील आरोपी ओमकार पांढरे आणि सुरज उर्फ चिक्या गायकवाड हे गावठी पिस्तूल घेऊन थांबले असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले.
ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे सुरज उर्फ चिक्या संतोष गायकवाड (वय १८, रा. आर्या एंटरप्रायझेस शेजारी, ग. नं. १, जाधवनगर, वडगाव बुद्रुक, पुणे) आणि ओमकार उर्फ दादया अशोक पांढरे (वय १८, रा. स्वामी समर्थ कॉम्प्लेक्स, फ्लॅट नं. १०२, दत्तमंदिराजवळ, सिंहगड कॅम्पस, वडगाव बुद्रुक, पुणे) अशी आहेत.
पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता ओमकार पांढरे याच्याकडून ४० हजार रुपये किमतीचे एक गावठी पिस्तूल आणि एक हजार रुपये किमतीचे जिवंत काडतूस, तर सुरज गायकवाड याच्याकडून ४० हजार रुपये किमतीचे एक गावठी पिस्तूल आणि एक हजार रुपये किमतीचे जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात आर्म्स अॅक्ट कलम ३(२५) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१), १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, दि. १९ ऑगस्ट रोजी सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग सुरू असताना पोलिस अंमलदार समीर माळवदकर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून वडगाव बुद्रुक येथील बँकिंग ट्रॅक परिसरात कारवाई करण्यात आली. तेथे रेकॉर्डवरील विधीसंघर्षित बालक हा अग्निशस्त्रासह आढळून आला.
त्याची पंचांसमक्ष झडती घेतली असता ४० हजार रुपये किमतीचे एक पिस्तूल आणि दोन हजार रुपये किमतीची दोन जिवंत काडतुसे मिळून आली. याप्रकरणी आर्म्स अॅक्ट कलम ३(२५) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१), १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक सचिनकुमार तरडे करीत आहेत.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई –
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त परिमंडळ-३ डॉ. सागर कवडे, सहायक पोलीस आयुक्त सिंहगड रोड विभाग विजय कुंभार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) समीर गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत पोलीस उपनिरीक्षक प्रविण कुलकर्णी, संतोष भांडवलकर आणि सचिनकुमार तरडे, तसेच पोलीस अंमलदार उत्तम तारु, आण्णा केकाण, सतिश मोरे, विकास बांदल, राहुल ओलेकर, सागर शेडगे, विनायक मोहिते, समीर माळवदकर, संदिप कांबळे, तानाजी सागर आणि शिरीष गावडे यांनी सहभाग घेतला.





