Pimpri : आयटीनगरीसाठी ‘सिंगल पॉइंट ॲथॉरिटी

पिंपरी : हिंजवडी आयटी पार्कची समस्या सोडवण्यासाठी मेट्रोचे काम डिसेंबर अखेर पूर्ण करण्यात येईल. वाहतूक सक्षम करण्यासाठी प्रस्तावित रस्ते आणि संबंधित विकासकामे मार्गी लावण्यासाठी सर्व शासकीय अस्थापनांसाठी ‘‘सिंगल पॉईंट ऑथॅरिटी’’ तयार केली जाईल, असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
हिंजवडी आयटी पार्कमधील वाढत्या नागरी व वाहतूक समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी IT फोरम आणि सोसायटी फेडरेशनच्या प्रतिनिधींनी आज विधानभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची यांची भेट घेतली. यावेळी भाजप आमदार महेश लांडगे, आमदार शंकर मांडेकर, आमदार शंकर जगताप उपस्थित होते.
आयटी फोरमचे सचिन लोंढे, सोसायटी फेडरेशनचे संजीवन सांगळे यांच्यासह शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यासोबत थेट चर्चा केली. बाणेर-बालेवाडी रेसिडेन्ट असोसिएशन, #UNCLOGHinjawadiITPark मोहीमेतील प्रतिनिधी, फोरम ऑफ आयटी एम्प्लॉइज, हिंजवडी एम्प्लॉइज ॲन्ड रेसिडेन्ट ट्रस्ट, मुळशी को-ऑपरेटीव्ह हौसिंग सोसायटी फेडरेशनचे प्रतिनिधी व शहरातील तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
हिंजवडी आयटी पार्क हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा आयटी हब असून, दररोज सुमारे पाच लाखांहून अधिक आयटी व्यावसायिक येथे ये-जा करतात. मात्र, अपुरी पायाभूत सुविधा, वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुर्दशा आणि समन्वयाचा अभाव या समस्यांमुळे रहिवासी व कर्मचाऱ्यांचे आयुष्य कठीण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर “हिंजवडी आयटी पार्कला अडथळ्यांमधून मुक्त करा” या मागणीकडे आमदार लांडगे यांनी लक्ष वेधले.
आमदार शंकर जगताप यांनी विधानसभेत सविस्तर भूमिका मांडत हिंजवडी फेज ३ पर्यंत ३० मीटर रुंदीचा पर्यायी रस्ता आरक्षित करून विकसित करण्याची मागणी केली. “या रस्त्यामुळे सध्याच्या मुख्य मार्गावरील ५० टक्क्यांहून अधिक वाहतूक डायव्हर्ट करता येईल आणि कोंडीचा कायमस्वरूपी प्रश्न सुटेल,” असे त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पीएमआरडीए आणि पिंपरी चिंचवड महापालिका यांना रस्ता आरक्षित करून लवकरात लवकर विकसित करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. तसेच निगडी मुकाई चौक–वाकड–नाशिक फाटा–चाकण या मार्गासाठी नवीन मेट्रोचा डीपीआर मंजूर करण्याची मागणीही आमदार शंकर जगताप यांनी केली. त्यावरही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेत, हा प्रस्ताव तात्काळ मंजुरीसाठी पुढे पाठवण्याचे आदेश दिले.
मुख्यमंत्री फडणीस यांचे प्रशासनाला निर्देश :
1. सर्व विभागांच्या समन्वयासाठी ‘‘सिंगल पॉईंट ॲथॉरिटी’’
2. भूमीसंपदानाच्या कामासाठी पीएमआरडीएने पुढाकार घ्यावा.
3. लक्ष्मी चौक येथील पूल सहापदरी करा.
4. डिसेंबर अखेर हिंजवडी मेट्रो सुरू करा.
5. एमआयडीसीने रस्ता रुंदीकरणाची कामे पूर्ण करावी.
6. मेट्रो प्रशासनाने पार्किंगचे प्रोव्हीजन करावे.
7. एक महिन्यामध्ये टीडीआर द्या आणि भूसंपादन करा.
8. अध्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून वाहतूक नियंत्रण करा.
9. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने वाहतूक संदर्भात अंमलबजावणी करावी.
10. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रशासनाने तातडीने कामे सुरू करावीत.
11. पुनावळे, ताथवडे, भूमकर चौक अंडरपासचे काम सुरू करावे.





