Singer Asha Bhosle Passes Away : “एका युगाचा अंत झाला”; आशा भोसले यांच्या निधनानंतर आशिष शेलार यांची प्रतिक्रिया
Singer Asha Bhosle Passes Away :

Singer Asha Bhosle Passes Away : ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी 92 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. आशा भोसले यांच्या छातीत संसर्ग झाल्याने त्यांना शनिवारी रात्री उशिरा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज आशा भोसले यांचे पुत्र आनंद भोसले यांनी आशा भोसले यांच्या निधनाची माहिती दिली. त्यांच्या जाण्याने हिंदी चित्रपटसृष्टी, गायन क्षेत्र आणि कला क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
उद्या दुपारी ४ वाजता आशा भोसले यांच्या पार्थिवावर अत्यंसंस्कार करण्यात येणार आहेत. आशा भोसले यांचे चिरंजीव आनंद भोसले यांनी आशा भोसलेंचे अवयव निकामी होत गेल्याने त्यांचं निधन झाल्याचे सांगितले.
तसेच उद्या सकाळी ११ ते २ या वेळेत त्या लोअर परळ या ठिकाणी त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. तर दुपारी ४ वाजता शिवाजी पार्क या ठिकाणी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत अशी माहिती आनंद भोसले यांनी दिली. त्यानंतर भाजप नेते आशिष शेलार यांनी देखील पत्रकारांसोबत संवाद साधताना आशा भोसले यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केले आहे.
एका युगाचा अंत झाला
“एका युगाचा अंत झाला आहे, आपल्या आशाताई आपल्यातून निघून गेल्या आहेत. आशाताईंचं असणं हे वर्षानुवर्षे समाधानाची अनुभूती देत होतं. आपल्या दुःखाला कवटाळून लोकांना आनंद देणं ही त्यांची खासियत होती. त्यांचं कर्तृत्व जगाला वेड लावणारं होतं. अशा आशाताई आज आपल्यात राहिल्या नाहीत. आता कुटुंबाने सांगितल्याप्रमाणे उद्या त्यांचं पार्थिव त्यांच्या लोअर परळ येथील निवासस्थानी ठेवण्यात येईल.
तिथे लोकांना अंत्यदर्शन घेता येईल. त्यानंतर शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात येतील. शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांचं नसणं हे आपल्याला आयुष्यभर दुःख देणारं आहे,” असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.
1943 पासून चित्रपटांमध्ये गायनाला सुरुवात
आशा भोसले यांचा जन्म 8 सप्टेंबर 1933 रोजी झाला. लता मंगेशकर यांची धाकटी बहीण असलेल्या आशाताईंनी शास्त्रीय, पॉप, कॅब्रे अशा विविध प्रकारची गाणी गायली आहे. 1943 पासून त्यांनी चित्रपटांमध्ये गायनाला सुरुवात केली. आजवर त्यांनी विविध भाषांमध्ये 12 हजारांहून अधिक गाणी गायली आहेत. आर. डी. बर्मन यांच्यासोबतची त्यांची जोडी खूप यशस्वी ठरली. आशा भोसले यांना पद्मविभूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार आणि अनेक फिल्मफेअर पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. Singer Asha Bhosle Passes Away
हेही वाचा:






