कोर्टवर उतरण्यासाठी सिंधू उत्सूक

नवी दिल्ली – करोना काळातही मी माझ्या तंदुरुस्तीबाबत अत्यंत जागरूक होते. काही काळ सरावही करण्याची मला संधी मिळाली. त्यामुळे आतशी मी पूर्ण तंदुरुस्त असून सरावासाठी तसेच सामन्यांसाठी बॅडमिंटन कोर्टवर उतरण्यासाठी सज्ज आहे, अशा शब्दात भारताची ऑलिम्पिक पदक विजेती बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने आपले मत व्यक्त केले आहे.
नियोजनात खंड पडणे चांगले नसते, त्यामुळे खेळाडूंच्या तंदुरुस्तीवर परिणाम होतो. मात्र, करोना काळात मी त्याबाबत अत्यंत जागरूक होते. घरातच बसून राहावे लागले असले तरीही मी आराम करण्यापेक्षा स्वतःच्या तंदुरुस्तीसाठी मेहनत घेत होते.
मी स्वतःला घरकामात गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न केला आणि त्याची मला मदत झाली. मी माझ्या कुटुंबासोबत खूप वेळ घालवला. मी कोर्टवर जाऊ शकत नव्हते. त्यामुळे मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा थोडे कठीण वाटले. आता मी कोर्टवर उतरण्यासाठी तंदुरुस्त असून स्पर्धा खेळण्यासाठी तयार आहे, असेही तिने सांगितले.





