दोहा : आंतरराष्ट्रीय नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत (आयएसएसएफ) भारताने दोन पदकांची कमाई केली. युवा नेमबाज सिमरनप्रीत कौर ब्रार हिने महिलांच्या २५ मीटर पिस्तूल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले, तर पुरुषांच्या ५० मीटर रायफल ३-पोजिशन स्पर्धेत ऐश्वर्य प्रताप सिंह तोमरने रौप्यपदकाची कमाई केली.सिमरनप्रीतने अंतिम फेरीत कारकीर्दीतील सर्वात मोठे यश मिळवत चीनची अव्वल नेमबाज आणि १० मीटर एअर पिस्तूलची सध्याची विश्वविजेती याओ कियानशुनला पराभूत करत सुवर्णपदकावर मोहर उमटवली. कियानशुनला ३६ तर सिमरनप्रीतने ४१ गुण मिळाले होते. जर्मनीची माजी विश्वविजेती डोरीन वेन्नेकॅम्पने कांस्यपदक पटकावले. पात्रता फेरीत सिमरनप्रीत आणि ईशा सिंग या दोघींनी ५८५ गुण नोंदवत अनुक्रमे चौथे व पाचवे स्थान मिळवले. मात्र, अंतिम फेरीत ईशा सिंग सातव्या स्थानावर राहिली. दुहेरी ऑलिम्पिक कांस्यविजेती मनू भाकरने ५८१ गुणांसह नवव्या स्थानावर राहून अंतिम फेरी गमावली. सुरुवातीला सिमरनप्रीतचे पहिल्या मालिकेत तीन निशाणे चुकल्याने ती आठव्या (शेवटच्या) स्थानावर घसरली होती. पण त्यानंतर तिने जबरदस्त पुनरागमन करत सुवर्णपदकावर नाव कोरले. दुसरीकडे, ५० मीटर रायफल ३-पोजिशन स्पर्धेत ऐश्वर्य प्रताप सिंह तोमरला केवळ ०.९ गुणांच्या फरकाने रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. या प्रकारात चेक प्रजासत्ताकाच्या जिरी प्रिव्हरात्स्कीने सुवर्णपदक जिंकले, तर ऑलिम्पिक विजेता चीनचा ल्यू युकुनला कांस्य मिळाले. दुहेरी ऑलिम्पियन आणि माजी ज्युनियर विश्वविजेता असलेल्या ऐश्वर्यने पात्रता फेरीत ५९५ गुण नोंदवले होते. चीनच्या तियान जियामिंगने मात्र ५९८ गुणांसह नवीन विश्वविक्रम प्रस्थापित केला. अंतिम फेरीत ऐश्वर्यने प्रोन पोजिशनमध्ये दमदार पुनरागमन केले आणि काही क्षण सुवर्णपदकाच्या दिशेने आघाडी घेतली. मात्र, शेवटच्या दोन फटक्यांत प्रिव्हरात्स्कीने बाजी मारली. या दोन पदकांसह भारताने दोहा विश्वचषक फायनलमध्ये आतापर्यंत चार पदके मिळवली आहेत. वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत ऐश्वर्यने दमदार कामगिरी करत वर्षाची सांगता केली आहे.