Pimpri-Chinchwad : अधिकमासात मुलींसह सुनेलाही चांदीच्या चपलांचे वाण; पिंपरी-चिंचवडमधील बारणे कुटुंबाचा उपक्रम
Pimpri-Chinchwad :

Pimpri-Chinchwad : अधिकमासाच्या निमित्ताने मुलींसह सुनेलाही समान सन्मान देत पिंपरी-चिंचवड येथील बारणे कुटुंबाने एक आगळावेगळा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. कुटुंबातील दोन मुलींप्रमाणेच सुनेलाही चांदीच्या चपलांची जोडी वाण म्हणून भेट देण्यात आली असून, मुलगी आणि सून यांच्यात कोणताही भेदभाव न करता समान सन्मान देण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला आहे.
या चांदीच्या चपला अत्यंत नाजूक आणि आकर्षक पद्धतीने तयार करण्यात आल्या असून त्यावर खडे व घुंगरू बसविण्यात आले आहेत. प्रत्येक जोडीचे वजन सुमारे २५० ग्रॅम असून तिन्ही जोड्यांचे एकूण वजन ७५० ग्रॅम आहे. सध्याच्या बाजारभावानुसार प्रत्येक जोडीची किंमत अंदाजे एक लाख रुपयांच्या घरात असल्याचे सांगण्यात आले.
विशेष म्हणजे, या चपला केवळ शोभेच्या वस्तू नसून दैनंदिन वापरासाठीही उपयुक्त ठरतील, अशा पद्धतीने त्यांची रचना करण्यात आली आहे. वापरादरम्यान कोणताही त्रास होऊ नये याची विशेष काळजी घेतल्याचे सांगण्यात आले.
रहाटणी येथील कोकणे चौकातील रांका ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेडकडून सचिन बारणे कुटुंबीयांनी या चपला तयार करून घेतल्या. राजस्थानमधील कारागिरांनी अवघ्या आठ दिवसांत या चपलांची निर्मिती केली असून, त्या तयार करताना बारणे कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते.
याशिवाय, अन्य एका ग्राहकाने अधिकमासानिमित्त आपल्या जावयाला चांदीची मोजडी वाण म्हणून भेट दिली आहे. ही मोजडीही दैनंदिन वापरासाठी उपयुक्त असून त्यावर आकर्षक मिनाकारीचे काम करण्यात आले आहे. राजस्थानमधील कारागिरांनीच ही मोजडी तयार केली असल्याची माहिती देण्यात आली.





