Gold-Silver Price: जागतिक बाजारपेठेतील घडामोडी आणि देशांतर्गत वाढत्या मागणीमुळे मौल्यवान धातूंच्या किमतींनी आज नवा इतिहास रचला आहे. बुधवारी चांदीच्या दरात ७,३०० रुपयांची प्रचंड वाढ होऊन चांदीने पहिल्यांदाच २ लाख रुपये प्रति किलोचा टप्पा ओलांडला. चांदीसोबतच सोन्याच्या दरातही ६०० रुपयांची वाढ झाल्याने सणासुदीच्या आणि लग्नसराईच्या काळात ग्राहकांच्या खिशाला मोठी कात्री लागणार आहे. ऑल इंडिया सराफा असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय राजधानीत चांदीचा भाव २,०५,८०० रुपये प्रति किलो या ऐतिहासिक स्तरावर पोहोचला आहे. मंगळवारी चांदी १,९८,५०० रुपयांवर बंद झाली होती. केवळ देशांतर्गतच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही चांदीने ६६ डॉलर प्रति औंसचा टप्पा ओलांडून ६६.५२ डॉलर या सर्वोच्च पातळीला स्पर्श केला आहे. सोन्याच्या किमतीतही आज मजबूती पाहायला मिळाली. प्रति १० ग्रॅम सोन्याचा भाव ६०० रुपयांनी वधारून १,३६,५०० रुपयांवर पोहोचला आहे. जागतिक बाजारात स्पॉट गोल्ड १८.५९ डॉलरच्या वाढीसह ४,३२१.०६ डॉलर प्रति औंसवर व्यवहार करत आहे. दरवाढीची मुख्य कारणे: जागतिक आर्थिक अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदारांचा कल सोन्या-चांदीकडे वाढला आहे. चांदीचा वापर उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणावर होत असल्याने मागणीत वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय भू-राजकीय तणावामुळे धातूंच्या किमतीवर परिणाम होत आहे. सोन्याच्या आयातीत मोठी घट वाणिज्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, नोव्हेंबर महिन्यात सोन्याच्या आयातीत ६० टक्क्यांची घट झाली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ९.८ अब्ज डॉलरची आयात झाली होती, जी यंदा ४ अब्ज डॉलरवर आली आहे. मात्र, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या आठ महिन्यांत (एप्रिल-नोव्हेंबर) एकूण आयात ३.३ टक्क्यांनी वाढून ४५.२६ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. “येणाऱ्या काळात जागतिक परिस्थितीनुसार बाजारात चढ-उतार पाहायला मिळू शकतात. मात्र, दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सोन्या-चांदीचा कल अजूनही सकारात्मक आहे,” असे बाजार अभ्यासकांचे म्हणणे आहे.