Silver Rates Today: देशांतर्गत सराफा बाजारात सध्या चांदीच्या किमतींनी सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. गुरुवारी, २९ जानेवारी रोजी चांदीच्या भावाने पहिल्यांदाच ४ लाख रुपये प्रति किलोचा ऐतिहासिक टप्पा ओलांडला. विशेष म्हणजे, गेल्या अवघ्या १० दिवसांत चांदीच्या दरात तब्बल १ लाख रुपयांची वाढ झाली आहे, ज्यामुळे गुंतवणूकदार आणि सामान्य ग्राहक दोन्ही अवाक झाले आहेत. १० दिवसांत १ लाखांची ऐतिहासिक झेप – चांदीच्या किमतीत झालेली ही वाढ अनपेक्षित मानली जात आहे. गेल्या १० दिवसांपासून चांदी सरासरी ४ ते ५ हजार रुपयांनी रोज महाग होत आहे. १९ जानेवारी रोजी चांदीचा भाव २,९३,९७५ रुपये होता, जो २८ जानेवारीपर्यंत ३,७६,९२३ रुपयांपर्यंत पोहोचला. आज २९ जानेवारीला या तेजीने उच्चांक गाठत ४ लाख रुपयांची पातळी ओलांडली. आज चांदीचा दर सायंकाळी साडेसहा वाजता एमसीएक्स वायदे बाजारात 32 हजार रुयांनी वाढून 4 लाख 17 हजार रुपये प्रतिकिलोवर पोहोचला होता. आंतरराष्ट्रीय बाजारातही चांदीने ११९ डॉलर प्रति औंस हा नवा रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे. silver दोन वर्षांत किमतीत थक्क करणारी वाढ – २०२४ पासून ते २०२६ पर्यंतच्या चांदीच्या किमतींचा प्रवास थक्क करणारा आहे. २०२४ मध्ये चांदीचे भाव ८० हजार ते ९० हजार रुपये प्रति किलो दरम्यान होते. २०२५ मध्ये किमतींनी मोठी उडी घेत १ लाख ते २ लाखांचा टप्पा गाठला. MCX वरील ताजी स्थिती – मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) ५ मार्च २०२६ च्या एक्सपायरीसाठी चांदीचा वायदा आज ३,९९,००० रुपयांवर उघडला. दुपारी १:१५ वाजेपर्यंत ही किंमत ४,०८,००० रुपयांवर पोहोचली होती. तर सायंकाळी 6:38 वाजता 4,17,500 वर पोहोचला होता. म्हणजेच 32 हजार 134 रुपयांनी आज वाढ झाली होती. राज्यसभेत उमटले पडसाद; सरकारवर टीका – चांदीच्या या बेतहाशा दरवाढीचे पडसाद आज संसदेतही उमटले. काँग्रेसचे खासदार नीरज डांगी यांनी हा मुद्दा उपस्थित करत सरकारवर निशाणा साधला. “गेल्या १३ महिन्यांत चांदीच्या दरात ३०६% आणि सोन्याच्या दरात १११% वाढ झाली आहे. ही दरवाढ ग्रामीण भागातील महिला आणि ज्यांच्या घरी लग्नकार्य आहे अशा कुटुंबांचे कंबरडे मोडणारी आहे. ही सरकारची आर्थिक आणि धोरणात्मक अपयशाची निशाणी आहे,” असे डांगी यांनी म्हटले. त्यांनी सरकारला या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करण्याची आणि साठेबाजांविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. सोन्या-चांदीच्या या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. हेही वाचा – Todays TOP 10 News: लाडक्या नेत्याला साश्रू नयनांनी निरोप ते राज्याच्या नवीन उपमुख्यमंत्र्याबाबत मोठी अपडेट, वाचा आजच्या टाॅप बातम्या