नवी दिल्ली: जागतिक बाजारपेठेतील घडामोडी आणि भू-राजकीय तणावामुळे मौल्यवान धातूंच्या किमतींनी सर्व उच्चांक मोडीत काढले आहेत. राष्ट्रीय राजधानीत बुधवारी चांदीच्या दराने मोठी झेप घेत २,२७,००० रुपये प्रति किलो हा नवा ऐतिहासिक टप्पा गाठला. एकाच दिवसात चांदीच्या दरात ९,७५० रुपयांची प्रचंड वाढ झाली आहे. तर दुसरीकडे, सोन्याने देखील आंतरराष्ट्रीय बाजारात प्रथमच ४,५०० डॉलरचा टप्पा ओलांडून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. ऑल इंडिया सर्राफा असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी चांदी २,१७,२५० रुपये प्रति किलो होती, ती बुधवारी थेट २.२७ लाखांवर पोहोचली. विशेष म्हणजे, ३१ डिसेंबर २०२४ रोजी चांदीचा भाव ८९,७०० रुपये होता. म्हणजेच, या एका वर्षात चांदीच्या किमतीत १,३७,३०० रुपयांची (१५३.०६ टक्के) अफाट वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीने ७२.७० डॉलर प्रति औंसची पातळी गाठली आहे. स्थानिक बाजारपेठेत ९९.९ टक्के शुद्धतेच्या सोन्याच्या दरात मंगळवारच्या तुलनेत ५० रुपयांची किरकोळ घसरण झाली. गुरुवारी सोन्याचा भाव १,४०,८०० रुपये प्रति १० ग्रॅम (करांसह) इतका नोंदवण्यात आला. जरी स्थानिक बाजारात किंचित घट दिसली असली, तरी आंतरराष्ट्रीय बाजारात ‘स्पॉट गोल्ड’ने ४,५२५.९६ डॉलर प्रति औंस हा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. या वर्षात सोन्याच्या किमतीत आतापर्यंत ७३.७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तेजीची मुख्य कारणे काय? बुलियन मार्केटमधील या दरवाढीमागे तज्ज्ञांनी प्रमुख कारणे सांगितली आहेत. अमेरिका आणि व्हेनेझुएला यांच्यातील वाढता संघर्ष गुंतवणूकदारांना सुरक्षित गुंतवणुकीकडे (Safe Haven) आकर्षित करत आहे. अमेरिकन डॉलरच्या मूल्यात झालेली घसरण आणि ‘फेडरल रिझर्व्ह’कडून व्याजात कपात होण्याची शक्यता यामुळे सोन्या-चांदीला झळाळी मिळाली आहे. जोपर्यंत जागतिक परिस्थिती स्थिर होत नाही, तोपर्यंत ही तेजी कायम राहण्याचा अंदाज एचडीएफसी सिक्योरिटीजचे विश्लेषक सौमिल गांधी यांनी वर्तवला आहे. “कमकुवत डॉलर आणि फेडरल रिझर्व्हचे नरम धोरण यामुळे चांदीसाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या चार सत्रांत चांदीच्या किमतीत ८.३ टक्क्यांची वाढ झाली आहे,” असे ऑगमेंटच्या रिसर्च हेड रेनिशा चैनानी यांनी नमूद केले.