नवी दिल्ली – रशिया – युक्रेन युद्ध, अमेरिकेचे आयात शुल्क आणि इतर कारणामुळे अगोदरच सोने आणि चांदीची खरेदी वाढली असताना या आठवड्यामध्ये अमेरिका व्याजदरात कपात करण्याची शक्यता वाढली आहे. अशा परिस्थितीत अगोदरच विक्रमी पातळीवर असलेले सोने आणि चांदीचे दर वाढून नव्या विक्रमी पातळीवर गेले. दिल्ली सराफात सोन्याचा दर 700 रुपयांनी वाढून 1 लाख 13 हजार 800 रुपये या नव्या विक्रमी पातळीवर गेला. गेल्या चार सत्रात सोन्याच्या दरात एकतर्फी वाढ होत आहे. चांदीचे दर अगोदरच उच्च पातळीवर असताना चांदीचा दर शुक्रवारी 4 हजार रुपयांनी वाढून 1 लाख 32 हजार रुपये प्रति किलो या नव्या विक्रमी पातळीवर गेला. चांदीची मागणी गुंतवणूक म्हणून तर वाढत आहेच त्याचबरोबर औद्योगिक क्षेत्रातूनही चांदीची मागणी वाढत आहे. सेमीकंडक्टर, इलेक्ट्रिक वाहन इत्यादी क्षेत्रात चांदीची मागणी वाढत राहणार आहे. त्यामुळे विविध देश चांदीचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करू लागले आहेत. एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक सौमिल गांधी यांनी सांगितले की, अमेरिकेतील स्थूल अर्थव्यवस्थेची नकारात्मक आकडेवारी बाहेर आली आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्याजदर कपातीसाठी दबाव आणला आहे. फेडरल रिझर्व्ह व्याजदर कपातीची आक्रमक मोहीम हाती घेण्याची शक्यता आहे. या तिमाहित म्हणजे डिसेंबरपूर्वी फेडरल रिझर्व किमान तीन वेळा व्याजदर कपात करेल असा दावा अनेक विश्लेषक करीत आहेत. अशा परिस्थितीत सोने आणि चांदी मधील गुंतवणूक सुरक्षित होणार आहे. कारण व्याजदर कपातीमुळे अमेरिकेत महागाई वाढण्याची शक्यता वाढली आहे. जागतिक बाजारात सोन्याचा दर 3,646 डॉलर आणि चांदीचा दर 42.31 डॉलर प्रति औंस या विक्रमी पातळीवर रेंगाळत आहे. चांदीने दिला 47% परतावा एक जानेवारीपासून जागतिक बाजारात आणि देशात चांदीच्या किमती तब्बल 47.16 टक्क्यांनी म्हणजे 42 हजार 300 रुपयांनी वाढल्या आहेत. 31 डिसेंबर रोजी चांदीचा दर 79 हजार 700 रुपये प्रति किलो होता. तो आता 1ू लाख 32 हजार रुपये इतका झाला आहे. याच कालावधीमध्ये सोन्याने तब्बल 43% चा परतावा दिला आहे. त्यामुळे या वर्षाच्या सुरुवातीला ज्यांनी सोने आणि चांदीची खरेदी केली त्यांना मोठ्या प्रमाणात नफा झाला आहे. या कालावधीत सेन्सेक्स आणि निफ्टीने इतका परतावा दिलेला नाही.