Silver and Gold Price: जागतिक बाजारपेठेत मौल्यवान धातूंच्या किमतीत सुरू असलेली विक्रमी दरवाढ थांबण्याचे नाव घेत नाहीये. सोमवारी दिल्लीच्या सराफा बाजारात सोने आणि चांदी या दोन्ही धातूंनी आतापर्यंतचा सर्वोच्च स्तर ऑल टाइम हाय गाठला आहे. चांदीच्या किमतीत एकाच दिवसात तब्बल १०,४०० रुपयांची प्रचंड वाढ झाली असून सोन्यानेही १.३८ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. सोन्याची विक्रमी भरारी दिल्ली सराफा बाजारात ९९.९ टक्के शुद्धतेच्या सोन्याच्या दरात आज १,६८५ रुपयांची मोठी वाढ नोंदवण्यात आली. या वाढीसह सोन्याचा भाव १,३८,२०० रुपये प्रति १० ग्रॅम या नव्या ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचला आहे. गेल्या शुक्रवारी बाजार बंद होताना सोन्याचे दर १,३६,५१५ रुपयांवर स्थिर होते. चांदीची ‘छप्परफाड’ तेजी चांदीच्या किमतीत आज झालेली वाढ थक्क करणारी ठरली. राजधानीत चांदीचे दर १०,४०० रुपयांच्या बंपर वाढीसह २,१४,५०० रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. गेल्या गुरुवारी चांदीने २,०७,६०० रुपयांचा विक्रम केला होता, मात्र शुक्रवारी त्यात ३,५०० रुपयांची घसरण झाली होती. आजच्या या प्रचंड वाढीमुळे चांदीने सर्व जुने विक्रम मोडीत काढले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातही चांदी २.३१ डॉलरने वधारून ६९.४५ डॉलर प्रति औंस या सर्वोच्च पातळीवर पोहोचली आहे. का वाढताहेत किमती? एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटी) सौमिल गांधी यांच्या मते, अमेरिकेत व्याजदरात होणारी कपात, तिथली ढासळती आर्थिक परिस्थिती आणि वाढती वित्तीय चिंता यामुळे जागतिक गुंतवणूकदार धास्तावले आहेत. अशा अस्थिर वातावरणात सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्या-चांदीकडे कल वाढल्याने किमतीत ही मोठी वाढ पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही सोन्याचा भाव ८०.८५ डॉलरने वधारून ४,४२०.३५ डॉलर प्रति औंस या विक्रमी स्तरावर पोहोचला आहे.