नवी दिल्ली – सोने आणि चांदीचे दर अभूतपूर्व वेगाने वाढून रोज नव्या विक्रमी पातळीवर जात आहेत. याबद्दल आता अर्थतज्ञामध्ये चरंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. गुंतवणूकदारांचा विविध देशांच्या अर्थव्यवस्थावरील विश्वास कमी होत आहे की काय असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे. आतापर्यंत तरी विविध देशांच्या शेअर बाजार निर्देशांकावर जास्त परिणाम झालेला नाही. मात्र आगामी काळात तशी शक्यता नाकारता येत नाही. अगोदरच अमेरिकन शेअर बाजारात मोठा बुडबुडा निर्माण झाला असल्याच्या शंका व्यक्त करण्यात येत आहेत. जागतिक बाजाराप्रमाणे दिल्ली सराफात बुधवारी चांदीचा दर एकाच दिवसात 15 हजार रुपयांनी म्हणजे 5.5 टक्क्यांनी वाढून 2 लाख 86 हजार 500 रुपये या अभूतपुर्व विक्रमी पातळीवर गेला. सोन्याचा दरही एकाच दिवसात दीड हजार रुपयांनी वाढून 1 लाख 46 हजार 500 रुपये या नव्या विक्रमी पातळीवर गेला. गेल्या चार सत्रात सोन्याचा दर 6 हजार रुपयांनी म्हणजे 4.3 टक्क्यांनी वाढला आहे. जानेवारीपासून सोन्याचा दर 8 हजार आठशे रुपयांनी म्हणजे 6.4 टक्क्यांनी वाढला आहे. जागतिक बाजारात सोने आणि चांदी विक्रमी पातळीवर घोडदौड करीत आहे. बुधवारी जागतिक बाजारात चांदीचा दर पाच टक्क्यांनी वाढून 91.56 डॉलर व सोन्याचा दर 1.14 टक्क्यांनी वाढून 4,640 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेला. किरकोळ आणि संस्थागत गुंतवणूकदाराबरोबरच विविध देशाच्या रिझर्व बँका डॉलरवर जास्त विसंबून राहावे लागणार नाही यासाठी सोन्याची खरेदी वाढवीत आहेत. अशा परिस्थितीत डॉलर कमकुवत होण्याची प्रक्रिया वेग घेत आहे. बर्याच देशांनी चांदीला रेअर अर्थ मेटलचा दर्जा दिला आहे आणि चांदीची साठेबाजी केली जात आहे. त्यामुळे सोने आणि चांदी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहे.