नवी दिल्ली – अमेरिका व्याजदरात कपात करणार असल्यामुळे सोने आणि चांदीची मागणी वाढली आहे. अशा परिस्थितीत बुधवारी दिल्ली सराफात चांदीचा दर एकाच दिवसात 11 हजार 500 रुपयांनी वाढून 1 लाख 92 हजार रुपये प्रति किलो या नव्या उच्चांक पातळीवर गेला आहे. जानेवारीपासून चांदीचा दर 114 टक्क्यांनी वाढला आहे. 31 डिसेंबर 2024 रोजी चांदीचा दर केवळ 79 हजार 700 रुपये होता. तो आता 1 लाख 92 हजार 500 रुपयावर गेला आहे. या कालावधीत चांदीच्या दरात 1 लाख 2,300 रुपयांची वाढ झाली आहे. दिल्ली सराफात सोन्याचा दर आठशे रुपयांनी वाढून 1 लाख 32 हजार 400 रुपये प्रति दहा ग्रॅम या पातळीवर गेला. या दरवाढीबाबत बोलताना एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक सौमील गांधी यांनी सांगितले की, अमेरीकेच्या शक्य व्याजदर कपातीमुळे डॉलर इतर चलनाच्या तुलनेत कमकुवत होत आहे. त्याचबरोबर चांदीची औद्योगिक क्षेत्रातून मागणी वाढली आहे. या कारणामुळे सोन्यापेक्षा चांदीच्या दरात जास्त वेगाने वाढ होत आहे. सध्या जागतिक बाजारात सोन्याचा दर 4,201 डॉलर आणि चांदीचा दर 61.60 डॉलर प्रति औंसापर्यंत वाढला आहे. दरम्यान जागतिक व्यापार युद्ध आणि इतर कारणामुळे सोने आण चांदीचे दर वाढत असल्यामुळे भारतातील मध्यमवर्ग आणि गरिबांना दागिन्यासाठी सोने खरेदी करणे अवघड झाले आहे. त्याचबरोबर भारताच्या आयातीत या दोन धातूचा वाटा वाढत असल्यामुळे चालू खात्याच्या तुटीवर परिणाम होणार आहे