Silver Price Crash: वर्ष २०२५ मध्ये सोन्या-चांदीच्या दराने गाठलेल्या विक्रमी उच्चांकाला आज वर्षाच्या अखेरच्या दिवशी मोठा ब्रेक लागला आहे. वर्षभर बाजारपेठेत राहिलेल्या जबरदस्त तेजीनंतर, आज ३१ डिसेंबर रोजी सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी नफावसुली (Profit Booking) पाहायला मिळाली. यामध्ये चांदीच्या किमतीत सर्वाधिक मोठी घसरण झाली असून सोन्याच्या दरातही काहीशी नरमी दिसून आली आहे. वायदा बाजारात मार्च २०२६ च्या चांदीच्या कराराचा भाव तब्बल ९ टक्क्यांनी कोसळून २,३२,२२८ रुपये प्रति किलोवर आला. या सत्रात चांदीच्या किमतीत सुमारे १९,००० रुपयांची मोठी घट नोंदवली गेल्याने गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. चांदीपाठोपाठ सोन्याच्या किमतीतही आज घट झाली असून MCX वर सोन्याचा भाव ७८२ रुपयांनी घसरून १,३५,८८४ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला. बाजार तज्ज्ञांच्या मते, ही घसरण दीर्घकाळापासून सुरू असलेल्या तेजीनंतर आलेल्या आक्रमक नफावसुलीचा परिणाम आहे. गुंतवणूकदार आणि व्यापाऱ्यांनी वर्षाच्या शेवटच्या दिवशी वाढलेल्या किमतींवर आपला नफा सुरक्षित करण्याला प्राधान्य दिले, ज्याचा थेट परिणाम बाजारभावावर झाला. यापूर्वी दोन्ही धातूंनी अतिशय मजबूत कामगिरी केली होती. कालच्या सत्रात सोन्याचा भाव १,३६,६६६ रुपयांवर बंद झाला होता, तर चांदीने २,५१,०१२ रुपये प्रति किलोचा विक्रमी स्तर गाठला होता, मात्र आज बाजार उघडताच परिस्थिती पूर्णपणे बदलली. जागतिक बाजारातही आज सोन्या-चांदीवर मोठा दबाव दिसून आला. आशियाई व्यापारादरम्यान स्पॉट गोल्डचे दर सुमारे ०.३ टक्क्यांनी घसरून ४,३३४ डॉलर प्रति औंसवर आले. गेल्या आठवड्यात सोन्याने ४,५४९.७१ डॉलरचा ऐतिहासिक उच्चांक गाठला होता, तिथून आता किमती खाली येताना दिसत आहेत. अमेरिकेतील गोल्ड फ्युचर्समध्येही १ टक्क्यांची घसरण नोंदवली गेली. या घसरणीमागे अमेरिकन मध्यवर्ती बँक, युएस फेडरल रिझर्व्हच्या बैठकीचा वृत्तांत देखील कारणीभूत ठरला आहे. फेडने २०२६ मध्ये व्याजदर कपातीबाबत फारसे आक्रमक संकेत न दिल्याने सोन्याच्या तेजीवर लगाम लागल्याचे मानले जात आहे. आजची घसरण मोठी असली तरी २०२५ हे संपूर्ण वर्ष गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर ठरले आहे. रशिया-युक्रेन युद्ध, व्हेनेझुएलातील तणाव आणि तैवानच्या मुद्द्यावरून वाढलेली भौगोलिक-राजकीय अनिश्चितता यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्या-चांदीला मोठी मागणी राहिली होती. मात्र, आता फेड रिझर्व्हचे कडक धोरण आणि वर्षाअखेरची नफावसुली यामुळे किमतीत करेक्शन पाहायला मिळत आहे. भविष्यात जर अमेरिकेने व्याजदर कपात मर्यादित ठेवली, तर सोन्या-चांदीच्या दरातील ही घसरण काही काळ कायम राहू शकते असा अंदाज वर्तवला जात आहे.