लष्कराचे वाहन 700 फूट खोल दरीत कोसळले, 4 जवान शहीद

गंगटोक: सिक्कीममध्ये गुरुवारी एक मोठी दुर्घटना घडली. पाकयोंग जिल्ह्यात लष्कराचे एक वाहन दरीत कोसळले. या अपघातात 4 जवान शहीद झाले. लष्कराचे वाहन पश्चिम बंगालमधील पेडोंग येथून सिक्कीममधील पाकयोंग जिल्ह्यातील सिल्क मार्गावरुन झुलुककडे जात असताना हा अपघात झाला.
वृत्तानुसार, लष्कराचे वाहन रस्त्यावरून घसरले आणि 700 ते 800 फूट खोल दरीत कोसळले. दलोपचंद दराजवळील वर्टिकल वीर येथे हा अपघात झाला. हे रेनॉक रोंगली हायवे जवळ येते, जे सिल्क मार्ग म्हणून प्रसिद्ध आहे.
मृतांमध्ये मध्य प्रदेशातील चालक प्रदीप पटेल, मणिपूर येथील क्राफ्टमॅन डब्ल्यू पीटर, हरियाणातील नाईक गुरसेव सिंग आणि तामिळनाडू येथील सुभेदार के थांगापांडी यांचा समावेश आहे. चालकासह सर्व सैनिक पश्चिम बंगालमधील बिनागुरी येथील एनरूट मिशन कमांड युनिटचे होते. या अपघाताबाबत सायंकाळपर्यंत भारतीय लष्कराकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.





