पुणे – जूनमध्ये देशभरात कमी पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला, असला, तरी जवळपास संपूर्ण जून महिना उकाडा सहन करावा लागण्याची चिन्हे आहेत. याबाबत हवामान विभागाने अधिकृत माहिती दिली आहे. उत्तरेकडील राज्ये काही राज्य वगळता, संपूर्ण देशभर नियमित सरासरीपेक्षा अधिक तापमान राहण्याची चिन्हे आहेत.
पारंपरिक ठोकत्याळ्यांनुसार दि. 7 जूनच्या मृग नक्षत्राच्या मुहुर्तावर पाऊस होतो, असे पूर्वी सांगितले जायचे. पण, मागच्या काही वर्षांत हे बदलले आहे. यंदाही तसेच असून, मान्सूनचा पाऊस महाराष्ट्रात दाखल होऊन तो सक्रीय होण्यास जूनची अखेर होण्याची चिन्हे आहेत.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, “जूनमध्ये दक्षिण भारतातील काही भाग, वायव्य भारत, अतिउत्तर भारत आणि ईशान्येकडील काही भाग जेथे सामान्यपेक्षा जास्त पाऊस अपेक्षित आहे. हे वगळता देशातील बहुतांश भागांमध्ये कमी पाऊस अपेक्षित आहे.’ ही स्थिती पाहता पाऊस जुलैमध्येच सक्रीय होईल का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. तसे झाले तर पेरणीचा हंगाम लांबण्याची शक्यता आहे.
वळिवाची शक्यता
दरम्यान, विदर्भ ते केरळ असा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्याच्या बहुतांश भागांत सध्या आर्द्रता वाढली आहे. त्यामुळे उकाड्यातही वाढ झाली आहे. याचा परिणाम म्हणून राज्यात काही ठिकाणी दि. 29 मेपासून पुढील 2,3 दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे उष्णतेपासून काही अंशी सुटका होण्याची चिन्हे आहेत.