लेखन ही एक कला असून त्यामागे ज्ञात गोष्टी पुढील पिढीसाठी उपलब्ध करून ठेवणे हा उदात्त हेतू अंतर्भूत आहे. पूर्वीच्या काळी लेखन करण्यासाठी अनेक साधने वापरली गेली. त्यातील जास्तीत जास्त काळापर्यंत नोंदी टिकून राहाव्यात, त्या नोंदी भविष्यकाळासाठी उपलब्ध व्हाव्यात म्हणून अशी माहितीही एका खास पद्धतीने दगडांवर कोरून ठेवली गेली आणि एका पिढीकडून पुढील पिढीला जो वारसा दिला गेला तो म्हणजे “शिलालेख’. दगडावर कोरलेला मजकूर म्हणजे “शिलालेख’ ही त्याची अगदी साधी सोपी व्याख्या आहे. या शिलालेखांसाठी गोलाकार, चौकोनी, उभट अशा खडकांची किंवा लेण्यांतील भिंतींची निवड केली गेल्याचे लक्षात येते. तसेच या लेखनासाठी प्रामुख्याने संस्कृत, पाली तसेच काही ठिकाणी तर अगदी त्या त्या राज्यांच्या प्रादेशिक भाषांचाही वापर केलेला आढळून येतो. असे शिलालेख आपल्याला पुरातन मंदिरे, मठ, लेणी, गड, किल्ले, ऐतिहासिक वास्तू अशा ठिकाणी पाहावयास मिळतात. सर्वाधिक शिलालेख हे प्राचीन बौद्धलेण्यांमध्ये पाहावयास मिळतात. या शिलालेखांत प्रामुख्याने तत्कालीन व त्या परिसरातील राजेरजवाडे यांचे अतुलनीय पराक्रम, दानशूरपणा, कारकीर्द, महत्त्वाच्या घटना यांच्या संदर्भातल्या विशेष नोंदी केलेल्या असतात. शिलालेखांना पुरातत्त्वशास्त्रात “पुराभिलेख’ म्हणजेच एखाद्या गोष्टीचा पुरावा असे म्हटले जाते. जुने शिलालेख शोधून त्याच्या आधारे त्या काळाचा अभ्यास करणे हे पुरातत्त्व विभागास सुलभ जाते. या शिलालेखांच्या दगडांवरून, त्यातील वापरलेल्या भाषेवरून काही चिन्हे आणि खुणा यावरून तसेच त्यातील व्यक्तींच्या नावाचा उल्लेख आणि अक्षरांची वळणे यावरून अनेक अज्ञान गोष्टीचा अभ्यासकांना खुलासा होतो. त्यामुळे असे शिलालेख हे त्यांच्या लेखी मोठे मार्गदर्शक ठरतात. त्यांचा बारकाईने अभ्यास, पाहणी, निरीक्षण केल्यावर त्याचा कालखंड माहीत होणे, तत्कालीन राजवटीचा शोध घेणे, त्याचे लिखित पुरावे म्हणून या शिलालेखांचा संदर्भ देता येणे, असे अनेक फायदे होतात. आपल्या भारतातील अनेक राज्यांमधील राजवटींचे असे शिलालेख या सांस्कृतिक खुणांचा हा जणू काही बोलका इतिहासच आहे. भारतात अनेक पराक्रमी राजांनी त्यांचे पराक्रम आणि दानशूरता त्यांच्या नावाने लिहून ठेवून आपला इतिहास पुढच्या पिढीसाठी शिलालेख स्वरूपात उपलब्ध करून ठेवलेला आहे. भगवान गौतम बुद्ध, वर्धमान महावीर, चंद्रगुप्त मौर्य, सम्राट अशोक यांच्या संदर्भात जसे शिलालेख सापडतात तसेच ते अगदी नजीकच्या काळातले काही शिलालेखही आपल्याला पाहायला मिळतात. – अरुण गोखले