प्रभात वृत्तसेवा बारामती ( प्रमोद ठोंबरे ) – बारामती नगरपरिषद ही चुरशीच्या वळणावर येऊन पोहोचली आहे. नगरपरिषदेत सत्ताधारी राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाला टक्कर देण्यासाठी मैदानात राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाने समविचारी घटक पक्षांना एकत्र करून निवडणूक लढविण्यासाठी मैदानात उतरली आहे. त्याचबरोबर भाजपा आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षांकडून एकजुटीने लढण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे बारामतीच्या आखाड्यात तिरंगी लढती होणार असल्याचे संकेत आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. आता अर्ज माघारीनंतर चित्र स्पष्ट होणार आहे.राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील फुटीनंतर बारामती नगरपरिषदेची निवडणूक होत आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या पक्षाचे पदाधिकारी, समर्थक, हे सक्रिय झाले होते. तसेच अजित पवार यांच्याकडील पदाधिकारी, कार्यकर्ते रिजार्च झाल्याने राजकीय हवा ऐन काळात वाढली आहे. नगराध्यक्ष पदासाठी अजित पवार यांच्याकडून बारामती बँकेचे अध्यक्ष सचिन सातव आणि शरद पवार यांच्याकडून बलराज बेलदार, भाजपकडून गोविंद देवकाते यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे नगरपरिषदेच्या आखाड्यात चांगलीच रंगत आली आहे. निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी चित्र स्पष्ट होणार आहे. यात फारसा बदल होणार नाही, अशी प्रतिक्रिया राजकीय जाणकारांनी दिली आहे. बसपा नगराध्यक्षपदासाठी शर्यतीत बसपाचे काळुराम चौधरी यांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्याचा परिणाम किती होणार याकडे लक्ष वेधले आहे. बसपाला मानणारा गट बारामतीत सक्रिय आहे. त्यामुळे चौधरी यांना लाभ होऊ शकतो. चौधरी यांनी शहरातील प्रश्नांवर प्रशासनाचे लक्ष वेधून कामाची यापूर्वीच चुणूक दाखविली आहे. अजित पवार यांच्या गोटात दोघे दाखल बारामती शहरातील माजी नगरसेवक सुनील सस्ते, विष्णुपंत चौधर यांनी अजित पवार यांच्या छावणीत दाखल झाले आहेत. त्यांनी यापूर्वी अपक्ष म्हणून निवडणूक नगरसेवक पद खेचून आणले होते. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बेरेजेचे राजकारण करीत दोघांची भर टाकली आहे. त्यामुळे अजित पवार यांनी विरोधकांची धार कमी केली आहे. गेल्या तीन ते चार वर्षांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून प्रबळ, प्रस्थापित, सामाजिक भान असलेले उमेदवार मैदानात उतरविले आहेत. राष्ट्रवादीविरोधात सर्व विरोधक एकवटले राष्ट्रवादी पक्ष (अजित पवार) यांच्याकडून एकूण २० प्रभागांत ४१ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. नगराध्यक्ष पदासाठी सचिन सातव हे तगडे, प्रस्थापित उमेदवार असल्याने अजित पवार गटाची ही जमेची बाजू आहे. राष्ट्रवादी (शरद पवार पक्ष) यांच्याकडून युगेंद्र पवार, सुभाष ढोले, कॉंग्रेसचे इंगोले, माजी नगरसेवक आरती शेंडगे हे सक्रिय झाले आहेत. शिवसेना (उबाठा), वंचित आघाडी, कॉंग्रेस आदी समविचारी घटक पक्षांची आघाडी करून मैदानात उतरली आहे. भाजपा आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) हे युतीचा धर्म पाळत आहेत. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुरेंद्र जेवरे यांच्यासोबत मावळे आहेत.