नवी दिल्ली : बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) प्रचंड विजयानंतर राजकीय सकाणु आता झारखंडकडे सरकत असल्याचे दिसून येत आहे. येथील सत्ताधारी पक्ष स्थिर दिसत असला तरी, अंतर्गत पातळीवर बदल होण्याची जोरदार शक्यता वर्तवली जाते आहे आणि तसे संकेतही मिळत आहेत. झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते आणि मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि त्यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांनी दोन दिवसांपूर्वी दिल्लीत भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याशी भेट घेतली. ही चर्चा केवळ औपचारिक नव्हती, तर एकत्र येण्याचा प्राथमिक करार झाला आहे असा दावाही केला जात आहे. अशीही चर्चा आहे की उपमुख्यमंत्रीपदावर चर्चा पुढे सरकली आहे आणि हे पद भारतीय जनता पार्टीचे बाबूलाल मरांडी किंवा चंपाई सोरेन यापैकी एका व्यक्तीला दिली जाऊ शकते. राज्यात सध्या झारखंड मुक्ती मोर्चा म्हणजे जेएमएम-काँग्रेस-राजद युतीचे सरकार असून त्यांच्याकडे सुरक्षित बहुमत आहे आणि कोणतेही मतभेद झाल्यास, जेएमएम स्वतःहून सरकार चालवण्यास सक्षम आहे. तथापि, हेमंत सोरेन सरकारच्या अडचणी अलिकडे वाढल्या आहेत, कारण विधानसभा निवडणुकीदरम्यान दिलेली अनेक आश्वासने आर्थिक संकटामुळे पूर्ण होऊ शकलेली नाहीत किंवा त्याची शक्यताही मावळत चालली आहे. मैया सन्मान योजनेअंतर्गत महिलांना दरमहा २,५०० रुपये आणि धान्याचा आधारभूत भाव ३,२०० रुपये प्रति क्विंटल करण्याची आश्वासने निवडणुकीच्या वेळी देण्यात आली होती. ती पूर्ण करण्यात सरकारला अडचणी येत आहेत. पुरेशा केंद्रीय निधीशिवाय ही आश्वासने पूर्ण करणे कठीण आहे. अशा परिस्थितीत, भाजपशी जवळीक झामुमोसाठी एक व्यवहार्य पर्याय म्हणून उदयास येऊ शकतो. दरम्यान, भाजप देखील त्याच्या राजकीय समीकरणांच्या पुनर्रचनाच्या टप्प्यातून जात आहे. विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर, पक्षाचे अंतर्गत मूल्यांकन असे आहे की सध्याच्या राजकीय समतोलात सत्तेत परत येणे सोपे होणार नाही. आदिवासी समुदायावरील भाजपची पकड कमकुवत झाली आहे आणि त्याचे राजकीय स्थान आकुंचन पावत आहे. यावेळी झामुमोसोबत संभाव्य युती भाजपला नवीन ताकद देऊ शकते. किमान, त्यामुळे हा संदेश जाईल की पक्ष राज्यातील प्रमुख सामाजिक गटांशी संवाद आणि भागीदारीसाठी तयार आहे. झारखंडच्या राजकारणात दीर्घकाळापासून विरुद्ध ध्रुव मानले जाणारे हेमंत सोरेन आणि बाबूलाल मरांडी गेल्या काही महिन्यांपासून असामान्यपणे शांत असल्याने भाजपसोबत सकारात्मक संबंधांची चर्चा अधिकच वाढली आहे. कोणतेही तीव्र हल्ले झालेले नाहीत, कोणतेही तीव्र आरोप झालेले नाहीत. त्यांच्या शांततेमुळे राजकीय निरीक्षक अधिकाधिक सतर्क झाले आहेत.