रावेत : मामुर्डी परिसरातील खड्डेमय व खराब रस्त्यांमुळे नागरिकांना होणारा प्रचंड त्रास अखेर उफाळून आला आहे. संकल्प फाउंडेशनचे स्थापक अध्यक्ष बापू कातळे यांच्या नेतृत्वाखाली मासुळकर सिटी, सिद्धार्थ नगर, मामुर्डी येथे खड्डेमुक्त रस्त्यांसाठी स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले. या उपक्रमाला स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, मोठ्या फलकावर हजारो स्वाक्षऱ्या नोंदवून प्रशासनाकडे तात्काळ कारवाईची मागणी करण्यात आली आहे. स्मूथ रोड्स, सेफ रायड्स या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. शाळकरी मुले, कामगार वर्ग, रुग्णवाहिका, दुचाकी, रिक्षा व चारचाकी वाहनचालकांना होणाऱ्या त्रासाची व्यथा नागरिकांनी मांडली. रस्त्यांवरील खोल खड्ड्यांमुळे अपघातांची संख्या वाढली असून, वाहतुकीत अडथळे निर्माण होत आहेत. तसेच खड्ड्यांमुळे वाहनेही नादुरूस्त होत असून रस्त्यातच बंद पडत आहेत. स्थानिक नागरिक दीपक दांडेकर यांनी सांगितले की, येथील अनेक गृहप्रकल्पाचे काम सुरू असल्यामुळे अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. या वाहनांमधून रस्त्यावर माती पडून त्याचा चिखल झाला आहे. या चिखलातून जाताना विशेषतः दुचाकी वाहने घसरून पडतात. तर RMC प्लांटच्या वाहनांमुळे रस्ते खचतात. तसेच या वाहनांतील सिमेंटही अनेकदा रस्त्यावर पडून त्याचा कडक दगडाप्रमाणे आकार होतो. आम्ही कर भरूनही आमच्या मूलभूत गरजांकडे प्रशासन दुर्लक्ष करते, ही बाब अत्यंत खेदजनक आहे. गुणवत्तापूर्ण डांबरीकरणाची मागणी या उपक्रमाद्वारे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला खड्डेमुक्त रस्त्यांची मागणीचे निवेदन दिले जाणार आहे. संकल्प फाउंडेशनने प्रशासनाला गुणवत्तापूर्ण डांबरीकरणाची हमी देण्याची मागणी केली आहे. प्रशासनाला नागरिकांचा इशारा स्थानिक रहिवाश्यांनीही प्रशासनाला इशारा दिला आहे की, तत्काळ पावले उचलली नाहीत तर नागरिकांचा संयम सुटेल. स्वाक्षरी मोहिमेत सहभागी झालेल्या हजारो नागरिकांच्या एकत्रित आवाजामुळे खड्डेमुक्त रस्त्यांचे हे आंदोलन मोठे जनआंदोलन बनण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. स्वाक्षरी अभियान हे नागरिकांच्या संतापाचे प्रतीक आहे. खराब व चिखलयुक्त रस्त्यांमुळे कोणत्याही क्षणी गंभीर दुर्घटना होऊ शकते. येथील रहिवासी लाखो रुपये खर्च करून घरे विकत घेतात, नियमित मिळकत कर भरतात; मात्र पायाभूत सुविधांपासून वंचित राहतात. प्रशासनाने मागणीची दखल न घेतल्यास तीव्र जनआंदोलन छेडले जाईल. – बापू कातळे, अध्यक्ष, संकल्प फाउंडेशन नवीन विकास आराखड्या नुसार मामुर्डीतील अंतर्गत रस्त्यांचे दर्जेदार काम करण्यात येणार आहे. रस्त्यासाठी जागा ताब्यात घेण्याचे काम सुरू आहे. अतिवृष्टीमुळे काही तांत्रिक अडचणींमुळे काम थांबले होते. पाऊस कमी झाल्यावर काम पूर्ण गतीने सुरू होईल. तात्पुरत्या स्वरूपात रस्ते वापरण्यायोग्य करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. – चंद्रकांत मुढाळ, कार्यकारी अभियंता, स्थापत्य विभाग