Siddhivinayak Temple – अंगारिका चतुर्थी निमित्ताने श्री सिद्धिविनायक मंदिर सिद्धटेक (ता. कर्जत) येथे भाविकांची प्रचंड गर्दी उसळली होती. पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. देवस्थानच्या वतीने सकाळी पाच वाजल्यापासून मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले होते. त्यामुळे लवकर दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. सकाळपासूनच मंदिर परिसरात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. दुपारी उन्हाची तीव्रता अधिक असतानाही भाविकांमध्ये उत्साह कायम दिसून आला. भाविकांनी रांगेत उभे राहून श्रींचे दर्शन घेतले. siddhivinayak temple siddhatek भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी देवस्थानच्या वतीने दर्शन बारीची सुयोग्य व्यवस्था केली होती. पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था करण्यात आली होती. ग्रामपंचायतीकडून वाहनांच्या पार्किंगसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आल्याने गर्दीचे नियोजन सुलभ झाले. दुपारी श्रींच्या मूर्तीला अभिषेक करून आकर्षक पोशाख, दागिने व फुलांच्या हारांनी सुंदर सजावट केली होती. मंदिर परिसरात रंगीबेरंगी फुलांची आकर्षक सजावट केल्याने भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. मंदिर परिसरातील मोकळ्या जागेत तात्पुरत्या बाजारपेठा फुलल्या होत्या. पूजा साहित्य, फळे व प्रसाद विक्रीसाठी अनेक विक्रेत्यांनी दुकाने लावल्याने परिसरात चैतन्य निर्माण झाले होते. दरम्यान, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कर्जत पोलीस स्टेशन यांच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवला होता. पोलिसांनी गर्दीचे नियोजन करीत भाविकांना सुरळीत दर्शन मिळावे यासाठी विशेष खबरदारी घेतली.