पाटणा : बिहारचे माजी मंत्री श्याम रजक यांनी रविवारी सत्तारूढ जेडीयूमध्ये वापसी केली. त्यांनी काही दिवसांपूर्वीच राजदला रामराम ठोकला होता. बिहारमध्ये 2020 यावर्षीच्या अखेरीस विधानसभा निवडणूक झाली. त्याआधी रजक यांनी जेडीयूला रामराम ठोकून राजदमध्ये प्रवेश केला. आता घरवापसी केल्यानंतर त्यांनी माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्या राजदवर जोरदार टीकास्त्र सोडले. भावनेच्या आहारी जाऊन मी राजदमध्ये प्रवेश केला. मात्र, त्या पक्षात माझा सातत्याने अपमान झाला. त्या पक्षात भ्रष्टाचार आणि घराणेशाही ही महत्वाची तत्वे आहेत. आता जेडीयू सत्तेत असल्याने मी घरवापसी करत असल्याचा आरोप राजदकडून करण्यात आला. मात्र, मी मंत्रिपद सोडून राजदमध्ये प्रवेश केल्याचे तो पक्ष विसरला, अशी टीका त्यांनी केली. राजदकडून राज्यसभेवर किंवा विधान परिषदेवर वर्णी लागेल अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र, तशी संधी न मिळाल्याने रजक नाराज झाले. त्यातून त्यांनी घरवापसीचा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे. त्यांचा फेरप्रवेश मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील जेडीयूचा उत्साह वाढवणारा आहे.