लोणावळा – सकल मराठा समाज, मावळ तालुका यांच्या वतीने सोमवारी (दि.4) पुकारण्यात आलेल्या “मावळ बंद’ ला लोणावळा शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अत्यावश्यक सेवा आणि शाळा तसेच महाविद्यालय वगळता या येथील व्यापारी संघटना, विविध रिक्षा, टॅक्सी संघटना, हॉटेल असोसिएशन यांनी या बंदला पाठिंबा दिल्याने लोणावळा शहरात सर्वत्र कडकडीत बंद पहायला मिळाला. जालन्यात झालेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बंदच्या दरम्यान लोणावळा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सर्वपक्षीय निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला मराठा समाज बांधवांसोबतच इतर समाजाचे नागरिकदेखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी अनेकांनी आपली मते मांडली. यात प्रामुख्याने मराठा समाजामध्ये महाराष्ट्र सरकार आणि सर्वच राजकीय पक्षांच्या विरोधात निर्माण झालेली चीड दिसून येत होती. महाराष्ट्र सरकारची शब्दात निषेध करण्याची वेळ आता संपूण गेली आहे. मराठ्यांच्या मनात धगधगत असलेल्या आगीला हवा देऊ नका. समाजाचा संयम संपत चालला आहे, सरकारला याची जाणीव असली पाहिजे. सरकारने आरक्षणाच्या बाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशा शब्दात आपली चीड व्यक्त करताना चौकाचौकात आंदोलनाला बसण्यापेक्षा आपण ज्या आमदार, खासदारांना निवडुन दिले आहे, त्यांच्या दरवाज्यापुढे जाऊन बसले पाहिजे असा सूर यावेळी निषेध सभेत बोलणाऱ्या वक्त्यांनी लावला. ज्या मराठा समाजाने कधी काळी दिल्ली झुकवली, त्या मराठा समाजाला आरक्षण तर सोडाच मात्र आज स्वतःसाठी संरक्षण मागण्याची वेळ आली आहे. मराठी भाषा, मराठी अस्मिता आणि आता मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रातच मराठी माणसाला संघर्ष करावा लागतो आहे, अशी खंत व्यक्त करतानाच यापुढे फार काळ संयम पाळला जाणार नाही असा इशारा सरकारला यावेळी देण्यात आला. तसेच केरळच्या धर्तीवर आरक्षणाची कक्षा वाढवून कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या अशी मागणी या निषेध सभेत करण्यात आली.