बारामती -मोरगाव (ता. बारामती) येथील अष्टविनायक तीर्थक्षेत्रापैकी एक असलेल्या मयुरेश्वर मंदिरात गणेश चतुर्थीच्या पहिल्या दिवशी शुकशुकाट जाणवत होता. दरवर्षी राज्यातून हजारोंच्या संख्येने भाविक मयुरेश्वराच्या दर्शनासाठी येतात. मात्र, यंदा करोनाच्या महामारीमुळे मंदिर बंद असल्याने भाविकांअभावी नीरव शांतता पसरली होती. विधिवत व परंपरेने चालत आलेले सर्व धार्मिक पूजा-पाठ कार्यक्रम पार पडले.
मोरगाव येथे (दि. 21) महासाधू मोरया गोसावी प्राप्त मंगलमूर्तीची स्वारीचे आगमन सायंकाळी सहाच्या दरम्यान झाले. यानंतर मुख्य विश्वस्त मंदार देव मंगलमूर्तीची स्वारी घेऊन मयुरेश्वराच्या मुख्य गाभाऱ्यात गेले. या मंगलमूर्ती स्वारीचे स्वागत विश्वस्त विनोद पवार, राजेंद्र उमाप, विश्राम देव यांनी केले.
यानंतर मंगलमूर्ती व मयुरेश्वराची भेट झाली. रात्रभर पदे, पूजापाठ आदी कार्यक्रम झाले. मुख्य विश्वस्त मंदार देव यांच्या हस्ते “श्रीं’ची महापूजा, पळीपूजा करण्यात आली. यावेळी विश्वस्त विनोद पवार, विश्राम देव उपस्थित होते.