Shriya Saran: अभिनेत्री श्रिया सरन सध्या तिच्या आगामी चित्रपट ‘दृश्यम 3’ मुळे चर्चेत आहे. उत्तराखंडमध्ये जन्मलेली आणि हिंदी भाषिक कुटुंबात वाढलेली श्रिया अनेक वर्षे साउथ इंडियन सिनेमात कार्यरत राहिली आहे. मात्र, तिला केवळ ‘साउथची अभिनेत्री’ म्हणून ओळखलं जातं, यावर तिने अलीकडेच आपली भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. हिंदी भाषिक कुटुंबात वाढ श्रिया सरनने (Shriya Saran)एका मुलाखतीत आपल्या प्रवासाबद्दल सांगताना म्हटलं, “माझा जन्म हरिद्वारमध्ये झाला. आयुष्याची पहिली 17 वर्षे मी तिथेच घालवली. कथक शिकण्यासाठी मी दिल्लीला आले आणि वयाच्या 17व्या वर्षी अभिनयाला सुरुवात केली. माझ्या कुटुंबासाठी तो मोठा निर्णय होता. वडील इंजिनिअर आहेत, आई शिक्षिका आहेत.” साउथ सिनेमाने दिले आयुष्याचे धडे साउथ इंडियन सिनेमातील अनुभवांबद्दल बोलताना श्रियाने सांगितलं की, “दिल्लीसारख्या छोट्या शहरातून आलेल्या माझ्यासाठी साउथमध्ये काम करणं सुरुवातीला थोडंसं धक्कादायक होतं. मला तमिळ किंवा तेलुगु येत नव्हतं, पण सेटवर जाऊन नवीन भाषा शिकणं, नवीन संस्कृती अनुभवणं या सगळ्यांनी मला आयुष्यासाठी तयार केलं. साउथने मला भरभरून प्रेम दिलं आहे. त्यामुळेच माझं मन आजही साउथ इंडियन आहे.” Shriya Saran ‘तुम्ही स्वतःला जे मानता, तेच तुम्ही असता’ ‘साउथ इंडियन अभिनेत्री’ म्हटलं जातं यावर श्रियाने अत्यंत परिपक्व उत्तर दिलं. ती म्हणाली, “तुम्ही स्वतःला जे मानता, तेच तुम्ही असता. जर तुम्ही सतत शिकत राहिलात, स्वतःला वाढू दिलंत, तर आयुष्य अधिक चांगल्या पद्धतीने जगता येतं.” श्रिया सरनने 2001 मध्ये तेलुगु चित्रपट ‘इष्टम’ मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. ‘छत्रपती’, ‘शिवाजी’, ‘मनम’, ‘पोक्किरी राजा’ यांसारख्या अनेक तमिळ-तेलुगु चित्रपटांत तिने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. हिंदी सिनेमातही तिची उपस्थिती सातत्याने दिसून आली आहे, विशेषतः ‘दृश्यम’ फ्रँचायझीमुळे. अलीकडेच ती 23 जानेवारी 2026 रोजी प्रदर्शित झालेल्या ‘स्पेस जेन: चंद्रयान’ या सीरिजमध्ये दिसली असून, वर्षाअखेरीस ‘दृश्यम 3’ मधून मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे.