पिंपरी | तळेगावचा ‘श्रीरूप’ शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात दुसरा

तळेगाव दाभाडे, (वार्ताहर) – येथील माऊंट सेन्ट ॲन हायस्कूलच्या श्रीरूप जगताप या विद्यार्थ्याने नुकत्याच झालेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत सीबीएससी आयसीएससी विभागात महाराष्ट्र राज्यात द्वितीय क्रमांक संपादन केला आहे.
श्रीरूपच्या या यशाने मावळच्या शैक्षणिक नावलौकिकात भर टाकली आहे. त्याला तळेगावच्या उत्कर्ष प्रबोधिनीचे विपुलकुमार भुसारे यांनी मार्गदर्शन केले. शिष्यवृत्ती परीक्षा ही स्पर्धा परीक्षेचा पाया समजली जाते.
या परीक्षेतील प्रश्नांची रचना अतिशय क्लिष्ट व विचार करायला लावणारी असते. परीक्षेमध्ये वेळेचे नियोजन अतिशय महत्वाचे असते. अभ्यासातील सातत्य, संयम व चिकाटी यामुळे हे यश प्राप्त झाल्याचे श्रीरूप याने सांगितले.
श्रीरूप हा पुणे जिल्हा परिषदेने गौरवलेले माजी मुख्याध्यापक कै. जनार्दन माळी यांचा नातू असून कडधे शाळेतील आदर्श शिक्षिका श्रीमती प्रज्ञा माळी यांचा सुपुत्र आहे. श्रीरुपच्या कौतुकास्पद यशाबद्दल मावळचे आमदार सुनील शेळके, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष अशोक शेलार, अमरदेवी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष लहूमामा शेलार, मा. उपाध्यक्ष पोपटराव भेगडे, शिक्षक नेते राजू भेगडे, खजिनदार सुहास माळी, युवा नेते योगेश माळी यांनी अभिनंदन केले आहे.




