Shripal Sabnis : कामगारांच्या ताकतीचा मोठा इतिहास आहे, कामगार हा गुलाम नव्हे तर राष्ट्राची अस्मिता आहे त्याच्या घामाचे व श्रमाचे मूल्य जपले पाहिजे, कामगारांचे वाले कमी होत आहेत,संघटनानी कामगारांच्या बाजूने भक्कमपणे उभे राहावे, कामगारांनो एक व्हा..!बदलत्या काळातही कामगार लढेल आणि जिंकेल असा विश्वास ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केला. कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे आयोजित रोटरी क्लब संभाजीनगर चिंचवड येथे कामगार क्षेत्र : काल आज आणि उद्या यावर अध्यक्षीय भाषणाच्या दरम्यान ते बोलत होते. यावेळी संयोजक कामगार नेते काशिनाथ नखाते , महाराष्ट्र मजदूर संघाचे अध्यक्ष इरफान सय्यद आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. नारायण मेघाजी लोखंडे व पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण आणि दीप प्रज्वलन करून चर्चासत्राचे उद्घाटन करण्यात आले. आता उठवू सारे रान…या गीताला कामगारांनी दाद दिली. प्रास्ताविकात नखाते म्हणाले की, यापूर्वी राज्यात गिरणी कामगारांपासून ,कामगारांच्या लढ्यांमध्ये बहुतांशी यश प्राप्त झालेले आहे. शेतकरी लढले आणि जिंकले मात्र आता कामगार सुद्धा लढतील, सर्व कामगार संघटनांनी एकत्रित येऊन नव्या कामगार कायद्यातले आवश्यक बदल आणि कामगार हितासाठी पुढील काळासाठी दिशा देणे गरजेचे आहे. इरफान सय्यद म्हणाले, नव्या तरतुदीमध्ये काही चांगले आहे आणि काही मध्ये बदल करण्याची गरज आहे, मात्र कामगारांच्या हितासाठी नेहमीच संघटनात्मक काम पुढे चालू ठेवणे गरजेचे आहे.