Shrinivas Kulkarni : ज्येष्ठ साहित्यिक श्रीनिवास कुलकर्णी यांचे निधन
मराठी साहित्याला आपल्या तरल, चित्रमय आणि आशयगर्भ लेखनाने समृद्ध करणारे ज्येष्ठ साहित्यिक श्रीनिवास विनायक कुलकर्णी (Shrinivas Kulkarni) (वय 92) यांचे गुरुवारी निधन झाले.

Shrinivas Kulkarni : मराठी साहित्याला आपल्या तरल, चित्रमय आणि आशयगर्भ लेखनाने समृद्ध करणारे ज्येष्ठ साहित्यिक श्रीनिवास विनायक कुलकर्णी (Shrinivas Kulkarni) (वय 92) यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या निधनाने कराडसह संपूर्ण मराठी साहित्यविश्वावर शोककळा पसरली असून, एका संवेदनशील शब्दचित्रकाराचा अंत झाल्याची भावना साहित्यप्रेमींमधून व्यक्त होत आहे.
सांगली जिल्ह्यातील कृष्णाकाठच्या औदुंबर येथे 20 नोव्हेंबर 1936 रोजी जन्मलेल्या श्रीनिवास कुलकर्णी (Shrinivas Kulkarni) यांच्यावर घरातील चित्रकलेचा वारसा लहानपणापासूनच होता. त्यांचे आजोबा आणि वडील हे चित्रकार असल्याने शब्दांतून जिवंत चित्रे उभी करण्याची विलक्षण ताकद त्यांच्या लेखणीत निर्माण झाली. सुरुवातीच्या काळात त्यांनी साइनबोर्ड पेंटिंग, तसेच ओगलेवाडी येथील कारखान्यात नोकरी करत साहित्यसाधना सुरू ठेवली.
1965 मध्ये प्रकाशित झालेली ‘डोह’ ही त्यांची पहिली कादंबरी मराठी साहित्यविश्वात विशेष गाजली. या कादंबरीला राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला होता.
तत्कालीन ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांनीही या साहित्यकृतीची दखल घेतली होती. त्यानंतर ‘सोन्याचा पिंपळ’, ‘पाण्याचे पंख’ आणि ‘कोरडी भिक्षा’ या ललित लेखसंग्रहांद्वारे त्यांनी मराठी वाचकांच्या मनावर वेगळी छाप उमटवली. त्यांचे सुरुवातीचे लेखन ‘सत्यकथा’ आणि ‘मौज’ या प्रतिष्ठित नियतकालिकांतून प्रकाशित झाले.
मराठी साहित्य क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना महाराष्ट्र फाउंडेशनचा साहित्य पुरस्कार मिळाला होता. तसेच महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा ‘विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार’ (2025-26) जाहीर होऊन त्यांचा सन्मान करण्यात आला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. आर्किटेक्ट उदयन कुलकर्णी आणि आलोक कुलकर्णी यांचे ते वडील होत.
कराडातील साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष
कराड येथे भरलेल्या 76 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात त्यांनी (Shrinivas Kulkarni) स्वागताध्यक्ष म्हणून महत्त्वाची जबाबदारी सांभाळली होती. त्यांच्या साहित्यसेवेचा गौरव म्हणून कराड पालिकेच्यावतीने नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, उपनगराध्यक्ष प्रतापराव साळुंखे आणि मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांच्या हस्ते नुकताच त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला होता. महाराष्ट्र साहित्य परिषद, कराड शाखेनेही त्यांचा विशेष गौरव केला होता.






