श्री क्षेत्र महाळुंगे महादेव मंदिर

पुणे-नाशिक महामार्गावर चाकणपासून सात किलोमीटर अंतरावर हिरव्यागार निसर्गाच्या कुशीत श्रीक्षेत्र महाळुंगे (इंगळे) हे गाव आहे. येथील देवस्थानच्या प्रवेशद्वारावरील महादेवाची सुंदर मूर्ती व नंदी लक्ष वेधून घेतात. आवारात डावीकडे श्री सिद्धिविनायक मंदिर, शेजारी महादेव मंदिर व त्रिभुवनी शंकर मंदिर, मागे सूर्यमुखी मारूती मंदिर आणि द्वारासमोर श्री भैरवनाथ मंदिर असा मंदिरांचा समूह आहे.

महादेवाचे शिवकालीन मंदिर मूळ काळ्या पाषाणातील आहे. आता संपूर्ण जीर्णोद्धार करून अतिशय नयनरम्य दिसते. मंदिराचे नंदीमंडप, सभामंडप आणि गर्भगृह असे तीन भाग आहेत. नंदीमंडपात काळ्या पाषाणातील विशालकाय नंदी विराजमान आहे. गर्भगृहात काळ्या पाषाणातील तीन फूट उंचीच्या सुबक आणि सुंदर शिवलिंगाचे दर्शन घडते. सुगंधी फुलांच्या मनमोहक सजावटीने वातावरण अतिशय प्रसन्न भासते. या शिवलिंगासमोर देवी पार्वती मातेची सुबक मूर्ती आहे. हे येथील वैशिष्ट्य आहे. सूर्यकिरणांचा अभिषेक थेट शिवलिंगावर होतो. या मंदिराशेजारी त्रिभुवनी शंकर मंदिर आहे. येथील भव्य शिवलिंगावर तीन शिवलिंग विराजमान आहे. हे दर्शन घडताच त्रिनेत्र महादेवच आपल्याला आशीर्वाद देत आहेत असे भासते. 

येथील भव्य सभामंडपात रसाळ कीर्तनांचे आयोजन होते. दूरदर्शनवरील “गजर कीर्तनाचा’ या कार्यक्रमातून त्याचे प्रक्षेपण होते. महाराष्ट्रातील थोर कीर्तन परंपरेचे जतन येथे होत आहे. येथील दीपमाळेच्या टोकाला एकच मोठा दिवा आहे. त्रिपुरी पौर्णिमेला दिव्यांच्या प्रकाशात संपूर्ण मंदिर परिसर उजळून निघतो. मंदिराला लागूनच शिवलिंगाच्या आकाराची विहीर आहे. तिला महादेवाची विहीर असे म्हणतात. पिंडीच्या निमुळत्या भागातून विहिरीत उतरायला पायऱ्या आहेत. 

– माधुरी शिवाजी विधाटे

Leave A Reply

Your email address will not be published.