पापाचा घडा भरल्यावर श्रीकृष्ण जन्म घेतो – आ. गोरे

कोपर्डे हवेली – गेल्या वीस वर्षांत कराड उत्तरेतील कार्यकर्त्यांना सत्ताधाऱ्यांनी खुप त्रास दिला आहे. विविध मार्गांनी त्यांची अडवणूक करण्यात आली. मात्र, जेव्हा पापाचा घडा भरतो; तेव्हा श्रीकृष्ण जन्म घेतो. त्याप्रमाणे आता त्रास देणाऱ्यांच्या पापाचा घडा भरला आहे, अशी जहरी टीका आ. जयकुमार गोरे यांनी केली.
कोपर्डे हवेली ता. कराड येथे भाजपच्या संवाद यात्रेनिमित्त कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी भाजपचे प्रदेश सचिव विक्रम पावसकर, वर्धन ग्रोचे धैर्यशील कदम, किसान मोर्चा प्रदेश सचिव रामकृष्ण वेताळ आदींची उपस्थिती होती.
आ. गोरे म्हणाले, आता आपले सरकार आपल्या पाठीशी आहे. ज्या अधिकाऱ्यांना आमच्या कार्यकर्त्यांची कामे करायची नाहीत, त्यांनी बॅग भरायची. ज्यांना दुसऱ्यांची तळी उचलायची आहेत; त्यांनी कारखान्यात जाऊन रहायचे, असा इशाराही त्यांनी विरोधकांना दिला. दरम्यान, रामकृष्ण वेताळ, धैर्यशील कदम, अक्षय चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले.





