श्री जगन्नाथ रथयात्रा महामहोत्सव रविवारी

पुणे – ओडिसामधील जगन्नाथ पुरी येथील रथयात्रा मोठ्या उत्साहात साजरी होते. त्याच पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ – इस्कॉन, पुणे यांच्यातर्फे रविवारी (७ जुलै) दुपारी एक वाजता टिळक रस्त्यावरील स.प.महाविद्यालय येथून आयोजित जगन्नाथ रथयात्रा सोहळ्याला प्रारंभ होणार आहे, अशी माहिती इस्कॉन मंदिराचे प्रवक्ते जनार्दन चितोडे आणि उपाध्यक्ष संजय भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली. रथयात्रा समन्वयक अनंतगोप प्रभू आणि संपर्क प्रमुख प्रसाद कारखानीस यावेळी उपस्थित होते.
जगन्नाथ पुरी येथे प्रत्येकजण वैयक्तिकरित्या जाऊ शकत नाही. त्यामुळे इस्कॉनचे संस्थापक आचार्य श्रील भक्तीवेदांत स्वामी प्रभुपाद यांनी भगवान जगन्नाथाची दया जगभर पसरवण्यासाठी रथयात्रा सुरू केली. रथयात्रेच्या दिवशी इस्कॉन कात्रज-कोंढवा रस्ता, पुणे मंदिरातील भगवान जगन्नाथ, बलराम आणि सुभद्रा यांच्या देवतांना खास दर्शनासाठी रथावर आणले जाते.
शहरातील राजकीय नेते, मंत्री इस्कॉन संस्थेचे संन्यासी प.पू. कृष्णचंद्र महाराज, प्रबोधनंद स्वामी, श्रीकृष्ण चैतन्य स्वामी आणि इस्कॉन मंदिराचे अध्यक्ष राधेश्याम प्रभू यांच्या हस्ते दुपारी १२ वाजता स.प. महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार आहे. मान्यवरांच्या हस्ते भगवान जगन्नाथ, बलदेव आणि सुभद्रा यांची आरती झाल्यानंतर एक वाजता रथयात्रेला प्रारंभ होईल.
स.प.महाविद्यालय, अभिनव महाविद्यालय चौक, बाजीराव रस्ता, शनिपार चौक, नगरकर तालीम चौक, लक्ष्मी रस्ता, शगुन चौक, रमणबाग शाळा, ओंकारेश्वर मंदिर, बालगंधर्व रंगमंदिर, जंगली महाराज रस्ता, खंडुजीबाबा चौक, टिळक चौक, टिळक रस्ता मार्गे स.प.महाविद्यालय येथे रथयात्रेचा समारोप होणार आहे. सायंकाळी ७ वाजता आरती, दर्शन आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.





