सातारा : श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांच्या 112 व्या पुण्यतिथी महोत्सवाची सुरुवात काल सकाळी अत्यंत भक्तिभावपूर्ण वातावरणात कोठी पूजनाने झाली. पहाटेपासूनच समाधी मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. हवेतील गारवा, वातावरणातील मंगल ध्वनी आणि ‘श्री अनंत कोटी ब्रह्मांडनायक’ या जयघोषाने परिसर भारावून गेला होता. विश्वस्त मंडळाच्या उपस्थितीत श्रींच्या पादुका व अक्षय बटव्याचे विधिपूर्वक पूजन मंत्रोच्चारात पार पडले. पुण्यतिथी महोत्सवानिमित्त मंदिर समितीने समाधी परिसर, सभामंडप आणि मंदिर मार्ग आकर्षक फुलांच्या माळांनी, विद्युत रोषणाईने व पारंपरिक सजावटीने उजळून टाकला आहे. संपूर्ण परिसरात शांततेमुळे आणि भक्तीभावामुळे भाविकांना विशेष अध्यात्मिक अनुभव लाभत होता. भक्तांच्या श्रद्धापूर्वक सहभागातून तयार करण्यात आलेल्या विविध देखाव्यांनी महोत्सवाला विशेष आकर्षण प्राप्त झाले आहे. फुलांपासून, भाजीपाल्यापासून, वेगवेगळ्या पारंपरिक साहित्यापासून साकारलेल्या सुंदर मांडण्या, श्रींच्या जीवनकार्याचे दर्शन घडवणाऱ्या कलाकृती आणि रामनाम जपावर आधारित आरास यांचे भाविकांकडून विशेष कौतुक होत होते. स्वयंपाकगृहात भाजीपाल्याच्या आकर्षक मांडण्यासह हार्दा श्री पट्टाभीराम मंदिराचा आकर्षक देखावा भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेत होता. पहाटे काकड आरती झाल्यानंतर कोठी पूजनाच्या मुख्य सोहळ्याला सुरुवात झाली. विश्वस्तांच्या हस्ते श्रींच्या पादुका व अक्षय बटव्याचे विधिपूर्वक पूजन करण्यात आले. त्यानंतर स्वयंपाक घरात मुलींचे पूजन करण्यात आले. गोशाळेतील गाईंचेही पूजन करून नैवेद्य भरवण्यात आला. नामसाधना मंदिरात एक माळ श्रीराम नाम करण्यात आला. त्यानंतर समाधी मंदिरात अखंड पहारा सुरू झाला. महोत्सवाच्या दहा दिवसांत श्रींच्या पादुका व प्रतिमेची मिरवणूक काढण्यात येणार आहे. याशिवाय अखंड नामस्मरण, भजन- कीर्तन, धार्मिक प्रवचने असे विविध कार्यक्रम होणार आहेत. विशेषतः श्रीराम नाम जपासाठी मोठ्या प्रमाणावर भक्त सहभागी होणार असल्याने परिसर भक्तिभावाने दुमदुमून जाणार आहे.