लाखो भाविकांचे श्रध्दास्थान वर्णे-आबापुरीचा श्री काळभैरवनाथ

वर्णे आबापुरी येथील श्री व काळभैरवनाथाचे मंदिर म्हणजे भाविकांसाठी पवित्र तीर्थक्षेत्र. दक्षिण काशी म्हणूनदेखील या तीर्थक्षेत्राची महती आहे. पुणे- बंगळूर महामार्गावरील बोरगाव येथून पूर्वेला सात किलोमीटर अंतरावर हे स्थान आहे. साताऱ्यातून देगावमार्गेही जाण्याची सोय आहे. श्री काळभैरवाचे मंदिर एका डोंगराच्या पायथ्याशी आहे. सभोवतालचा परिसरदेखील निसर्गरम्य आहे. दर वर्षी फाल्गुन वद्य दशमीस देवाची मोठी यात्रा भरते. गुलाल खोबऱ्याची उधळण करत काळभैरवाचा जयघोष केला जातो. राज्याच्या विविध भागांतील भाविक मोठ्या संख्येने यात्रेत सहभागी होतात.
काशीचे काळभैरव दक्षिण दिशेला वर्णे आबापुरीत आहेत, अशीच या भाविकांची श्रद्धा आहे. याबाबतची माहिती संदर्भग्रंथातून पुढे येते. येथील आहेत. मंदिरदेखील भव्य अन् प्रेक्षणीय आहे. समोरील बाजूस मोठमोठे वृक्ष आहेत. म्हसोबा, लक्ष्मी, सरस्वती आदी देवतांची मंदिरेही या परिसरात आहेत. काही अंतरावरच माजी शिवकला अधिकाऱ्यांचे स्मृतिस्थान आहे. वर्णे गावाच्या बाजूने मंदिराकडे जाताना जोतिबा, वडजाईदेवी यांचीही मंदिर आहेत. दक्षिण दरवाजाच्या आत डाव्या बाजूला श्री नारायणाचे मंदिर, श्री काळभैरवनाथांची मूर्ती आहे. शेजारीच प्रशस्त सभागृह आहे. आजवर येथे हजारो विवाह संपन्न झाले.
मंदिराच्या आवारात एकूण 11 टप्पे आहेत. मुख्य मंदिरासमोरील मंडपात नंदी व हनुमानाच्या मूर्ती आहेत. नंदीसमोरच काही अंतरावर बाळांगण आहे. उजव्या बाजूस ढोल ठेवण्याची जागा आहे. मुख्य मंदिरात श्री काळभैरवनाथ व देवी जोगेश्वरी यांच्या आकर्षक मूर्ती आहेत. अलीकडच्या काळात मंदिर, तसेच शिखराचा जीर्णोद्धार करण्यात आला असून त्यामुळे मंदिरासह परिसराच्या सौंदर्यात भर पडली आहे.
श्री काळभैरव देवाचे विविध उत्सव साजरे केले जातात. त्यात दर रविवारी तसेच पौर्णिमा, अमावस्या या दिवशी विविध धार्मिक कार्यक्रम आयोजिले जातात. देवस्थानचे मुख्य मानकरी म्हणून उंब्रज येथील विनायक बाबूराव महाजन यांचा मान आहे. देवाचे चाकर म्हणून घडशी, गुरव, माळी, गोसावी सेवा बजावतात. हरिजागरावेळी गोसावी नाथांची कथा ऐकवतात. रात्री बारा वाजता देवाचे झाड धुनीजवळ बसते. मग त्यांना शिवकळा प्राप्त होते. या वेळी विविध धार्मिक कार्यक्रम होऊन हरिजागराची सांगता होते. यात्रेदिवशी दुपारी बारा वाजता संपूर्ण लवाजमा डोंगरावरील स्थानाकडे जातो. दुपारी तीन वाजता तो परततो. सायंकाळी पाच वाजता हाच छबिना लवाजम्यासह वर्णे गावात येतो. पुन्हा पहाटे पाच वाजता विवाहासाठी मंदिराकडे मार्गस्थ होतो. तेथील सोहळा मोठा नयनरम्य असतो. तिथेच सोहळ्याची सांगता होते.
महाराष्ट्र,कर्नाटक व आंध्रप्रदेशातील भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या वर्णे (आबापुरी, ता. सातारा) येथील श्री काळभैरवनाथ देवाच्या वार्षिक यात्रेस आजपासून मोठ्या उत्साहात प्रारंभ होत आहे. यात्राकालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून त्यानिमित्त या जागृत देवस्थानाविषयी…..





