Shree Gundicha Temple : ओडिशातील पुरीमध्ये श्री गुंडिचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी; तिघांचा मृत्यू

भुवनेश्वर : ओडिशाच्या पुरीमधील श्री गुंडिचा मंदिराजवळ रविवारी चेंगराचेंगरीची दुर्दैवी घटना घडली. त्यामध्ये तिघे भाविक मृत्युमुखी पडले, तर सुमारे ५० जण जखमी झाले. सध्या सुरू असलेल्या भगवान जगन्नाथ रथयात्रेशी संबंधित सोहळ्यावेळी ती दुर्घटना घडली. रथयात्रेतील रथ सध्या श्री गुंडिचा मंदिरासमोर स्थानापन्न झाले आहेत. त्या परिसरात मोठ्या संख्येने भाविक जमलेले असताना पहाटे ४.२० च्या सुमारास चेंगराचेंगरी झाली.
धार्मिक विधीची सामग्री घेऊन आलेले २ ट्रक भाविकांची गर्दी असलेल्या ठिकाणी पोहचले. त्यानंतर गोंधळ उडून चेंगराचेंगरी झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली. मृतांमध्ये २ महिलांचा आणि एका वृद्धाचा समावेश आहे. जखमींना उपचारासाठी तातडीने नजीकच्या रूग्णालयांत हलवण्यात आले. जखमींपैकी ६ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.
ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन मांझी यांनी दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल दु:ख व्यक्त केले. त्यांनी राज्य सरकारच्या वतीने भाविकांची माफीही मागितली. मृतांच्या कुटूंबीयांना राज्य सरकारकडून प्रत्येकी २५ लाख रूपयांची मदत जाहीर करण्यात आली. दुर्घटनेची प्रशासकीय चौकशी केली जाणार आहे. त्याशिवाय, प्राथमिक कारवाईचा भाग म्हणून जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांच्या बदलीचे आदेश देण्यात आले.





