श्रावणी बैलपोळा: शिरूर तालुक्यात सर्जा-राजाच्या मिरवणुकीत शेतकऱ्यांचा उत्साह

जांबूत – शिरूर तालुक्यातील पिंपरखेड, काठापूर खुर्द, जांबूत आणि परिसरात श्रावणी बैलपोळा सण मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक थाटात साजरा झाला. शेतकऱ्यांचा हा लाडका सण सर्जा-राजा बैलांच्या सन्मानाचा आणि शेतीच्या समृद्धीचा प्रतीक मानला जातो. यंदा वरुणराजाच्या कृपेने हिरव्या शेतात नवचैतन्य निर्माण झालेले असताना, शेतकऱ्यांनी ढोल-ताशे, लेझीम आणि डीजे च्या तालावर बैलांच्या मिरवणुकीत आनंद लुटला.
पिंपरखेड, काठापूर आणि जांबूत गावांमध्ये दरवर्षी हा सण पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. यांत्रिक शेतीच्या वाढत्या वापरामुळे बैल पाळण्याचे प्रमाण कमी झाले असले तरी, बैलगाडा शर्यतीच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे अनेक शेतकऱ्यांनी पुन्हा बैल पाळण्यास सुरुवात केली आहे. यंदाच्या बैलपोळ्याच्या निमित्ताने शेतकऱ्यांनी आपल्या बैलांना स्वच्छ पाण्याने अंघोळ घालून, त्यांच्या शिंगांना सोनेरी रंग, रंगीबेरंगी गोंडे आणि आकर्षक झुलींनी सजवले. बैलांच्या अंगावर रंगोटी करून त्यांना आकर्षक रूपात सजवण्यात आले.
गावातील हनुमान मंदिराला पारंपरिक वाद्यांच्या गजरात प्रदक्षिणा घातल्यानंतर, शेतकऱ्यांनी ढोल-लेझीमच्या तालावर आणि भंडाऱ्याची उधळण करत सामुदायिक मिरवणूक काढली. या मिरवणुकीत सर्जा-राजा बैलांचा थाट आणि शेतकऱ्यांचा उत्साह पाहण्यासारखा होता. ज्या शेतकऱ्यांकडे बैल नव्हते, त्यांनी पारंपरिक मातीच्या बैलांची पूजा करून हा सण साजरा केला.
सणाच्या निमित्ताने शेतकऱ्यांनी तयार केलेली पुरणपोळी बैलांना प्रेमाने खाऊ घालून त्यांनी आपुलकी आणि आनंदाने हा सण साजरा केला. बैलपोळ्याच्या या उत्सवाने शेतकऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करत शेती आणि बैलांच्या सख्यतेची परंपरा पुन्हा एकदा अधोरेखित केली.





