‘खासदार दाखवा बक्षीस मिळवा’; भाजपकडून खासदार भावना गवळी यांच्याविषयी बॅनरबाजी

यवतमाळ : लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि लोकांपर्यंत पोहचण्यासाठी शिवसेनेकडून विदर्भ आणि मराठवाड्यात शिवसंपर्क अभियान सुरु केले आहे. मात्र, यवतमाळ-वाशिम मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी मागील सहा महिन्यांपासून मतदारसंघात फिरकल्या नाहीत. नागरिकांनी कोणाकडे आपल्या अडचणी मांडायच्या असा सवाल निर्माण करण्यात येत आहे. त्यांच्या याच मुद्द्यावरून गवळी यांच्या मतदारसंघात भाजपकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे.
भारतीय जनता पार्टीकडून खासदार भावना गवळी यांना दाखवा आणि बक्षीस मिळवा, असे बॅनर यवतमाळ शहरातील एलआयसी चौकात लावण्यात आले. या बॅनरमध्ये आपण सुरु केले शिवसंपर्क अभियान या निमित्ताने का होईना आम्हा मिळेल खासदारांच्या दर्शनाचा मान !! असे म्हणत काही मजकूर छापण्यात आला आहे. तसेच बॅनर लावून खासदार भावना गवळी यांना शोधून आणणाऱ्यास बक्षीस देण्याचे भाजपकडून जाहीर करण्यात आले आहे.
मनी लाँड्रिंग, विविध संस्थांमधील घोटाळ्यांच्या संबंधित कागदपत्रे आणि पुरावे, हरीश सारडा नामक त्यांच्या विरोधकाने ईडीला सुपूर्त केले. त्यानंतर वाशिमसह इतर काही ठिकाणी धाडीही पडल्या. त्यातच त्यांचे निकटवर्तीय सईद खान यांना ईडीने 27 सप्टेंबर 2021 रोजी मुंबईतून अटक केली आणि भावना गवळींचे आयुष्य बदलले.
ईडीचे समन्स आल्यापासून खासदार भावना गवळी अचानक सार्वजनिक कार्यक्रमातून गायब झाल्या आहेत. आपल्या मतदारसंघात खुल्या पद्धतीने त्या कार्यकर्त्यांना शेवटचे 27 सप्टेंबर 2021 रोजी भेटले आहेत. त्यानंतर तीन-चार दिवसांतच भावना गवळींना ईडीचे पहिले समन आले. आतापर्यंत ईडीने चार वेळा भावना गवळींना समन्स जारी केले आहेत, मात्र वेगवेगळ्या कारणांमुळे त्या अजून एकदाही ईडीला सामोरे गेल्या नाहीत. जाहीर कार्यक्रम जरी त्या घेत नसल्या तरी संसदेत त्या आताही येतात, मात्र फारशा सक्रिय दिसत नाहीत.





