शेअर बाजारात त्सुनामी! कोट्यावधी रुपये बुडाले, घसरण सुरू असताना गुंतवणूक काढावी की वाढवावी? जाणून घ्या

Share Market News | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाचा परिणाम जगभरातील शेअर बाजारावर पाहायला मिळत आहे. याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर देखील पाहायला मिळाला असून, एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे 13 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
आज सकाळी सेन्सेक्स तब्बल 4 हजार अंकांनी कोसळून 71,425.01 वर उघडला. तर निफ्टी-50 इंडेक्स 1 हजारपेक्षा अधिक अंकांनी कोसळून 21,758.40 वर उघडला. बाजार बंद होताना हे दोन्ही इंडेक्स जवळपास 3 टक्क्यांनी घसरले होते. सेन्सेक्स 2226.79 अंक अथवा 2.95% घसरून 73,137.90 वर बंद झाला. तर निफ्टी-50 इंडेक्स 742.85 अंक किंवा 3.24% टक्के घसरून 22,161.60 वर बंद झाला.
बाजारात प्रचंड घसरण होत असताना आधी केलेली गुंतवणूक काढावी की शेअर्सची किंमत कमी झाल्याने गुंतवणूक वाढवावी? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. तुम्ही देखील याबाबतचा विचार करत असाल तर याविषयी जाणून घेऊया.
गुंतवणूक काढावी की ठेवावी?
शेअर बाजारात घसरण झाली कीअनेक गुंतवणूकदार घाईने निर्णय घेण्याचा प्रयत्न करतात. मात्र, तज्ज्ञांच्या मतेअशावेळी विचारपूर्वक आणि दीर्घकालीन दृष्टीकोन ठेवून निर्णय घेणे आवश्यक आहे. गुंतवणूक काढावी की ठेवावी? हे तुमच्या आर्थिक क्षमता, उद्दिष्टांवरून ठरत असते.
- तत्काळ आर्थिक गरज: जर तुम्हाला लवकरच पैशांची गरज भासणार असेल, तर काही प्रमाणात गुंतवणूक काढणे योग्य ठरू शकते. मात्र, बाजार घसरलेला असताना पैसे काढल्यास नुकसान सहन करावे लागेल. त्यामुळे शक्य असल्यास गुंतवणूक काढू नये.
- जोखीम सहन करण्याची मर्यादा: बाजारातील चढ-उतार तुमच्या पोर्टफोलियोमध्ये प्रचंड घसरण दिसू शकते. यामुळे आर्थिक नुकसान तर होतेच. मात्र, मानसिक आरोग्यावरही याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे तर जोखमीचा अंदाज घेऊन गुंतवणुकीचे पुनर्मूल्यांकन करावे.
- गुंतवणुकीचे उद्दिष्ट बदलले असल्यास: आर्थिक उद्दिष्ट किंवा कालावधी बदलला असल्यास, गुंतवणुकीत बदल करणे आवश्यक असते. जोखीम स्विकारण्याची क्षमता नसल्यास व त्वरित पैसे लागत असल्यास गुंतवणूक काढण्याचा विचार करू शकता.
सध्याची घसरण — नवी संधी?
बाजार घसरलेला असताना अनेक मजबूत कंपन्यांचे शेअर्स स्वस्तात उपलब्ध होतात. दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी हे चांगले वेळसंधी ठरू शकते. मात्र, गुंतवणुकीपूर्वी काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात घ्यायला हवे.
- कंपनीबद्दल जाणून घ्या: घसरण झाली म्हणून त्वरित कोणत्याही कंपनीचे शेअर्स खरेदी करू नये. कंपनीचा आर्थिक ताळेबंद, व्यवस्थापन, व्यवसाय आणि भविष्यातील वाढीचा दर यांचा अभ्यास करूनच निर्णय घ्यावा.
- दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवा: बाजारातील तात्पुरत्या घडामोडींवर प्रतिक्रिया न देता, स्थिर व संयमी गुंतवणूक धोरण स्वीकारायला हवे. बाजारात दर काही महिन्यांना चढउतार पाहायला मिळतात. त्यामुळे दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवणे कधीही फायद्याचे.
- टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करा: एकाच वेळी संपूर्ण रक्कम गुंतवण्याऐवजी SIP किंवा टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करणे अधिक सुरक्षित मानले जाते. तुम्ही तुमच्या गुंतवणुकीमध्ये विविधता आणू शकता.
- तज्ज्ञांचा सल्ला घ्या: गुंतवणुकीसंबंधी कोणताही निर्णय घेण्यापूर्वी अनुभवी वित्तीय सल्लागाराचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.
- नवीन SIP सुरू करण्याचा विचार करा : सध्याच्या घसरणीमुळे जर तुम्हाला बाजारात शिस्तबद्ध पद्धतीने गुंतवणूक करायची असेल, तर Systematic Investment Plan (SIP) सुरू करणे हा चांगला पर्याय असू शकतो. थोडक्यात, बाजार कोसळत असताना घाई करू नये. शांत राहून आणि योग्य संधीचा फायदा घ्यावा.
(नोंद – लेखामधील माहिती हा कोणत्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्याआधी वित्तीय सल्लागाराशी चर्चा करावी.)





