पिंपरी – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयास जागा, इमारती, मनुष्यबळ यासह वाहने व इतर अनेक बाबींची कमतरता आहे. अत्यल्प संसाधनांवर आयुक्तालयाचा कारभार सुरू आहे. निवडणुकीच्या काळात पोलिसांना खूप सतर्क राहावे लागते, परंतु अशा काळात देखील पोलिसांना आवश्यक इतकी वाहने तात्पुरत्या स्वरुपातही पुरविण्यात आली नाहीत. ऐन निवडणूक काळात पोलिसांना वाहनांची कमतरता प्रकर्षाने जाणविली. निवडणूक काळात धावपळ वाढली असल्याने अधिकची 40 वाहने मागवली आहेत. मात्र त्यातील केवळ 17 वाहने पोलिसांना मिळाली आहेत.
चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक सुरू आहे. रविवारी (दि. 26) यासाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. चिंचवड विधानसभा क्षेत्रात 18 मतदान केंद्र संवेदनशील आहेत. त्यामुळे त्या केंद्रांवर शस्त्रधारी मनुष्यबळ पुरविण्यात आले आहे. निवडणुकीसाठी बाहेरून अधिकारी, कर्मचारी मागवण्यात आले आहेत. इतर ठिकाणी निवडणुका आणि तर कारणांचा बंदोबस्त नसल्याने मोठ्या प्रमाणात अतिरिक्त मनुष्यबळ पिंपरी-चिंचवड पोलिसांना उपलब्ध झाले आहे. निवडणूक काळात केंद्रीय औद्योगिक दल, इंडो तिबेटियन बॉर्डर फोर्स, केंद्रीय राखीव पोलीस दल आदींसह विविध घटकातून पोलीस अधिकारी आणि अंमलदार आले आहेत. एकूण एक हजार 869 पोलीस अधिकारी, कर्मचारी निवडणूक काळात बंदोबस्तावर आहेत.
पिंपरी-चिंचवड पोलिसांकडे मुळातच वाहने कमी आहेत. आयुक्तालयाच्या सुरुवातीला पुणे ग्रामीण आणि पुणे शहर पोलिसांकडून मिळालेली वाहने शेवटची घटका मोजणारी होती. त्यामुळे त्यातील अनेक वाहने बंद पडली आहेत. दरम्यान, सीएसआर फंड, राज्य शासनाकडून मिळालेल्या फंडातून आयुक्तालयाला वाहने मिळाली. आवश्यकतेच्या तुलनेत तीही खूप कमी होती. चिंचवड विधानसभा मतदारसंघ हा क्षेत्रफळ आणि लोकसंख्येच्या दृष्टीने खूप मोठा मतदारसंघ आहे. पोटनिवडणूक अतिशय चुरशीची झाली आहे. उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या रॅली, पदयात्रा समोरा-समोर आल्या की गोंधळ उडल्याच्या, तसेच कार्यकर्ते आणि नेत्यांमध्येही वाद-विवादाच्या अनेक घटना घडल्या आहेत. यामुळे पोलिसांनी वेगाने कुठल्याही स्थळी पोहचण्यासाठी किंवा गस्त वाढविण्यासाठी अतिरिक्त वाहनांची गरज होती. परंतु मागणीच्या निम्मीही वाहने पोलिसांना पुरविण्यात आली नाहीत.
महासंचालकांकडून केवळ दोन वाहने निवडणूक विभागकडून पंधरा वाहने
निवडणूक काळात पिंपरी-चिंचवड पोलिसांनी महासंचालक कार्यालयाकडून 20 आणि जिल्हा निवडणूक विभागाकडून 20 वाहनांची मागणी केली. महासंचालक कार्यालयाकडून पिंपरी-चिंचवड पोलिसांना निवडणुकीसाठी अवघी दोन चारचाकी वाहने पुरवली आहेत. तर निवडणूक विभागाने 15 वाहने दिली आहेत. निवडणूक काळात निवडणूक विभाग विविध शासकीय विभागातील शासकीय वाहने निवडणुकीच्या कामासाठी लावतात. त्यातीलच ही 15 चारचाकी वाहने पिंपरी-चिंचवड पोलिसांना मिळाली आहेत. जिल्हा नियोजन समितीकडून पिंपरी-चिंचवड पोलिसांना वाहनांसाठी दोन कोटी रुपये मिळाले आहेत. मात्र त्या निधीतून वाहने येण्यास आणखी विलंब आहे. दरम्यानच्या काळात वेगवेगळ्या बंदोबस्तासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांची वाहनांसाठी वणवण सुरूच आहेत.