Vaccine Shortage | लसीअभावी मुंबईतील 25 केंद्रे ठप्प

मुंबई – लसीच्या पुरवठ्याअभावी मुंबईतील 25 हॉस्पिटलमधील केंद्रे बंद करण्याची वेळ काल आली, अशी माहिती मुंबई महापालिकेच्या निवेदनात देण्यात आली आहे. मुंबईत महापालिकेची एकूण 71 लसीकरणाची केंद्रे आहेत त्यातील 25 केंद्रावर लस संपल्याने काल ही केंद्रे बंद झाली होती.
उर्वरित केंद्रांमध्ये केवळ एक दिवस पुरेल एवढाच साठा आहे, असेही महापालिकेने म्हटले आहे. महापालिकेच्या व्यतिरिक्त राज्य सरकारतर्फेही 49 लसीकरण केंद्रे मुंबईत सुरू आहेत. या केंद्रांवर रोज चाळीस ते पन्नास हजार लोकांना लस दिली जाते. 7 एप्रिलपर्यंत मुंबई महापालिकेला एकूण 17 लाख 9 हजार 550 करोना लसीचे डोस पुरवण्यात आले.
त्यापैकी 15 लाख 61 हजार 420 डोस प्रत्यक्षात वापरण्यात आले आहेत. राज्य सरकारच्या धोरणानुसार 44 हजार 810 डोस राखीव ठेवण्यात आले होते. गुरुवारी सकाळी 1 लाख 3 हजार 320 डोस उपलब्ध होते, त्यातील 40 ते 50 हजार डोस वापरण्यात आले आहेत.





