राजगुरूनगर : खेड तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांपासून ५०० रुपयांच्या स्टँम्पपेपरचा तीव्र तुटवडा निर्माण झाल्याने शासकीय कामकाजासाठी येणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. ५०० रुपयांचा स्टँम्प उपलब्ध नसल्याने नागरिकांना पर्याय म्हणून १०० रुपयांचे पाच स्टँम्प जोडून कागदपत्रे सादर करावी लागत आहेत. यामुळे अतिरिक्त खर्च तसेच कागदपत्रांची पडताळणी व नोंदणी यांतही वेळेचा अपव्यय होत आहे. पुणे जिल्हा ट्रेझरीतून तालुकानिहाय स्टँम्पपेपरचे वितरण करण्यासाठी विशेष वाहन पाठवले जात असले तरी खेड तालुक्याला पुरवठा करणारे वाहन येत नसल्याची माहिती स्थानिक प्रशासनाकडून दिली जात आहे. मात्र, नेमके हे वाहन कुठे अडते किंवा तुटवड्याची खरी कारणे काय आहेत, याबद्दल प्रशासन स्पष्ट माहिती देत नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. गेल्या पंधरा दिवसांत पुरवठा का झाला नाही, यावर अधिकाऱ्यांचे मौन आहे. नागरिकांनी ५०० रुपयांच्या स्टँम्पचा तातडीने पुरवठा सुरू करण्याची मागणी केली आहे. स्टँप पुरवठा करणाऱ्या वाहनाच्या विलंबाचे खरे कारण प्रशासनाने जाहीर करावे आणि छपाई थांबवण्याबाबतच्या अफवांना शासनाने अधिकृत स्पष्टीकरण द्यावे, तसेच ई-स्टँम्पची सुविधा वाढवावी, जेणेकरून तुटवड्याचा प्रश्न मिटेल, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे. ५०० रुपयांचे स्टँम्प गायब, १०० रुपयांचाही स्टॉक संपतोय सध्या ५०० रुपयांच्या स्टँम्पपेपरचा पुरवठा पूर्णपणे ठप्प आहे. यात भर म्हणून १०० रुपयांच्या स्टँम्पपेपरचाही स्टॉक वेगाने संपत चालला आहे. स्टॉक संपल्यास नोंदणी कार्यालय, महसूल कचेरी, न्यायालयीन प्रक्रिया यांमध्ये मोठी अडचण निर्माण होऊन शासकीय कामकाजावर मोठा परिणाम होण्याची भीती आहे. ५०० रुपयांचा स्टँम्प वापरण्यास भाग पाडणार सरकार? १०० रुपयांच्या स्टँम्पपेपरची छपाई पुढील काळात थांबवून सरकार केवळ ५०० रुपयांचा स्टँम्पपेपर वापरात आणण्याची शक्यता असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. यामुळे लहान व्यवहारांनाही ५०० रुपयांचा स्टँम्पपेपर लावावा लागेल आणि आर्थिक भार वाढेल. नागरिकांची परवड वाढीव खर्चामुळे सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागत आहे. घरखरेदी, जमीन व्यवहार, नॉन-क्रीमी लेअर, शासकीय अर्ज अशा कामांना अडथळा येत असून, नोंदणी कार्यालयात कागदपत्रे तयार करण्यास विलंब लागत आहे.