Pimpri : भात रोपांची टंचाई, शेतकऱ्यांपुढे संकट

वडगाव मावळ : मावळ तालुक्यात यंदा मान्सून आणि अवकाळी पावसाच्या तडाख्यामुळे शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली आहे. काही शेतकऱ्यांना भात पेरणीच करता आली नाही, तर अनेकांची भाताची खाचरे पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने भात रोपे नष्ट झाली आहेत. यामुळे मावळ तालुक्यात भात रोपांची मोठ्या प्रमाणावर टंचाई निर्माण झाली असून, खरीप हंगामाचे भवितव्य धोक्यात आले आहे. मावळ तालुक्यात गेले दीड ते दोन महिने अवकाळी व मान्सूनच्या पावसाने झोडपून काढले. यामुळे शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी लागणारा वापसा न मिळाल्यामुळे अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे.
मावळ तालुका हा जरी अति पावसाळी तालुका असला तरी पावसाची सुरुवात मात्र जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून होत असते. यावर्षी मात्र या पावसाने जवळपास एक महिना अगोदर, मे महिन्यापासूनच सुरुवात केली. पावसाचा जोर एवढा आहे की, आजही अनेक ठिकाणी खाचरांतील पाणी ओसरणे झालेले नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे पेरणीचे काम रखडले आहे.
दररोज पडणाऱ्या पावसामुळे शेतकरी चिंतेत आहेत. ज्या शेतकऱ्यांनी जून महिन्यातच भाताची पेरणी केली, त्यांची रोपे आता तयार झाली असून त्यांनी भात लावणीस सुरुवात केली आहे. मात्र, अनेक शेतकरी अद्याप पेरणीच करू शकलेले नाहीत. त्यामुळे त्यांच्यासमोर रोपे कुठून आणावीत आणि या हंगामात भात लागवड होईल का’ असे प्रश्न निर्माण झाले आहेत.
भरपूर पाणी तरी संकट
मावळ तालुक्यात साधारणतः ९० टक्के क्षेत्र भात लागवडीखाली असते. मात्र, यंदाच्या परिस्थितीमुळे संपूर्ण क्षेत्र लागवडीखाली येईल की नाही, याबाबत शंका निर्माण झाली आहे. शेतकऱ्याला नेहमीच चांगल्या पावसाची अपेक्षा असते. परंतु यंदा वेळेपूर्वी सुरु झालेल्या आणि सतत कोसळणाऱ्या पावसामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. मावळ तालुक्यातील वडिवळे, आंध्रा, जाधववाडी ही मोठी धरणे ८० टक्क्यांपर्यंत भरली आहेत. कासारसाई, पुसाणे, आढले, मळवंडी ठुले ही लहान धरणे शंभर टक्के भरून वाहू लागली आहेत. त्यामुळे नद्यांना पूर आला असून, सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. शेतकऱ्यांसमोर सध्या पेरणी व भात रोपे मिळविण्याचे मोठे संकट उभे ठाकले आहे.
पूर्व मावळात भात लागवडीला सुरुवात
मावळ तालुक्याच्या पूर्व पट्ट्यात काही गावांमध्ये मात्र खरीप भात लागवडीला सुरुवात झाली आहे. डोणे, आढले, दिवड, राजेवाडी, ओवळे, पुसाणे, पाचाणे, चांदखेड आदी गावांतील शेतकऱ्यांनी भात लावणीस प्रारंभ केला आहे, अशी माहिती सहाय्यक कृषी अधिकारी अक्षय ढुमणे यांनी दिली.





