पुणे -पुणे रेल्वे स्थानकावर गेल्या काही दिवसांपासून भारतीय रेल्वेचा अधिकृत पेयजल ब्रॅंड, “रेल नीर’ पॅकेज्ड पाण्याच्या बाटल्यांचा तुटवडा भासत आहे. पुणे रेल्वे स्थानकावर “रेल नीर’च्या बाटल्यांचा पुरवठा कमी झाल्याने हा तुटवडा भासत आहे. यामुळे पाण्याच्या बाटल्या उपलब्ध नसल्याबद्दल प्रवाशांच्या तक्रारी वाढल्या आहेत. एका प्रवाशाने सांगितले की, पुण्यात दिवसेंदिवस वाढणारे तापमान पाहता पाण्याच्या बाटल्यांची मागणी वाढत आहे. मात्र, ही मागणी पूर्ण करण्यात रेल्वे विभागाला अपयश आले आहे. जर ते पुरेशा बाटल्या देऊ शकत नसतील तर त्यांनी रेल्वे स्थानकावर इतर ब्रॅंडच्या विक्रीला परवानगी द्यावी. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पावले उचलली जात असल्याचे आश्वासन रेल्वे अधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहे. ‘रेल नीर’च्या बाटल्यांच्या नवीन पुरवठ्यासाठी ऑर्डर आधीच देण्यात आल्या आहेत, परंतु अद्याप पुरवठा झालेला नाही. परिस्थिती हाताळण्यासाठी, रेल्वे अधिकाऱ्यांनी 31 मे पर्यंत पुणे रेल्वे स्थानकावर पॅकेज्ड वॉटरच्या पर्यायी ब्रॅंडची विक्री करण्यास अधिकृत परवाणगी दिली आहे. शिवाय, 31 मार्चपर्यंत परिस्थिती सुधारली नाही तर इतर वॉटर ब्रॅंडची विक्री वाढवण्याची शक्यता त्यांनी नमूद केली आहे. “रेल नीर’ बाटल्यांच्या तुटवड्याने पुण्यातच नव्हे तर देशाच्या इतर भागांमध्येही चिंता वाढवली आहे. उन्हाळ्याचे महिने सुरू असताना, प्रवाशांची गैरसोय होणार नाही आणि त्यांना नेहमी पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे यासाठी रेल्वे अधिकाऱ्यांनी त्वरीत पावले उचलणे महत्त्वाचे आहे.