Kamshet : पिक काढणी हंगामात मजुरांचा तुटवडा; पीक सुरक्षित घरात आणण्यासाठी धावपळ
Kamshet : पावसाची चिंता, मजुरांचा तुटवडा आणि वाढता शेती खर्च, अशा तिहेरी संकटाचा सामना

कामशेत – यंदा भात पीक काढणीला आले असतानाच पावसाचे सावट निर्माण झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. हातातोंडाशी आलेले पीक सुरक्षितपणे घरात आणण्यासाठी शेतकरी दिवसरात्र मेहनत घेत आहेत. मात्र यंदा काढणीच्या हंगामात मजुरांचा मोठा तुटवडा जाणवत आहे.
भात कापणी, भारे बांधणे, झोडणी आणि मळणी या कामांसाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांची कसरत सुरू आहे. मजूर मिळवण्यासाठी गावोगावी शोधाशोध करावी लागत आहे. काही ठिकाणी मजुरीचे दरही वाढल्याने उत्पादन खर्चात भर पडत आहे.
मावळ तालुक्यातील अनेक गावांमध्ये भात हे प्रमुख खरीप पीक आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक गणित या पिकावर अवलंबून असते. वर्षभर मेहनत करून उभे केलेले पीक काढणीच्या टप्प्यावर असताना पाऊस झाल्यास नुकसान होण्याची भीती आहे.
कापलेले भात भिजल्यास दाण्यांची गुणवत्ता खालावण्याची शक्यता आहे. तसेच शेतात उभ्या असलेल्या काढणीला आलेल्या पिकालाही फटका बसू शकतो.
त्यामुळे पावसाचा अंदाज लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी काढणीची कामे वेगाने सुरू केली. सकाळपासून सायंकाळपर्यंत शेतात काम सुरू आहे. महिला, पुरुष तसेच कुटुंबातील लहान-मोठे सदस्यही काढणीच्या कामात हातभार लावत आहेत. काही शेतकरी उपलब्ध यंत्रसामग्रीच्या मदतीने काढणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत.
एकीकडे पावसाची चिंता, दुसरीकडे मजुरांचा तुटवडा आणि वाढता शेती खर्च, अशा तिहेरी संकटाचा सामना मावळातील शेतकऱ्यांना करावा लागत आहे. पावसाने दगा देण्यापूर्वी भात पीक सुरक्षितपणे घरात यावे, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
Alephata : परसबागेत पिकविलेली भाजी थेट विद्यार्थ्यांच्या ताटात





